दीपक ढोले
जालना : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊन तसेच कडक निर्बंध लागू करण्यात आले होते. या काळात अत्यावश्यक सेवा सुरू ठेवण्यात आल्या. त्यामुळे या काळात अपघात कमी होईल, असे वाटले होते. परंतु, गेल्या दोन वर्षांच्या तुलनेत २०२०मध्ये महामार्गावर झालेल्या १५६ अपघातात सर्वाधिक ९४ जणांना आपला जीव गमवावा लागला. अनेकांचा जीव घेणाऱ्या या महामार्गांना मृत्यूमार्ग म्हटले, तर वावगे ठरणार नाही. गेल्या वर्षभरात तीन दिवसात एकाला अपघातात जीव गमवावा लागला आहे.
सुरक्षित प्रवास, सुरक्षित रस्ता ठेवण्याची जबाबदारी पालिका, पोलिसांसह वाहनचालकांचीदेखील आहे. दुर्दैवाने हे घटक आपली जबाबदारी घेण्यास तयार होत नाहीत. याचा परिपाक म्हणून जीवघेण्या अपघातांची मालिका सहजतेने कमी होताना दिसत नाही. जालना जिल्ह्यात जानेवारी ते डिसेंबर या कालावधीत जीवघेणे, गंभीर, तसेच किरकोळ स्वरूपाचे एकूण १४६ अपघात झाले. यातील ८७ जीवघेण्या अपघातांमध्ये ८७ व्यक्ती मृत्युमुखी पडल्या आहेत. रस्ता अपघातात सरासरी तीन दिवसाला एका नागरिकाचा मृत्यू झाला. ८७ अपघातात ४४ जण गंभीर जखमी झाले आहेत. ६९ अपघातांमध्ये ९३ व्यक्तिंना किरकोळ स्वरूपाच्या दुखापती झाल्या. याशिवाय कोणतीही दुखापत न झालेल्या अपघातांची संख्या १०० इतकी आहे. या वर्षात जवळपास ३० टक्के व्यक्ती रस्त्याने चालताना अथवा रस्ता ओलांडताना भरधाव वाहनांचे बळी ठरले. दोन वाहनांचा अपघात होणे ही वेगळी बाब आहे. मात्र, रस्त्याच्या कडेला उभ्या असलेल्या, रस्ता ओलांडत असलेल्या, रस्त्यावर चालणाऱ्या व्यक्तिंना भरधाव वाहनांनी धडक देणे आणि त्यात त्या व्यक्तिचा हकनाक जीव जाणे हे दुर्दैवीच म्हणावे लागेल.
का होतात अपघात ?
मरण ही न चुकणारी बाब आहे. मात्र, अवेळी आणि रस्त्यावर असा मृत्यू येणे यापेक्षा दुर्दैव ते काय असू शकते? वाहनांचा स्पीड, तसेच हेल्मेट, सीट बेल्ट वापराकडे होणारे दुर्लक्ष याचा थेट परिणाम अपघातात मृत्युमुखी पडणाऱ्या व्यक्तींच्या संख्येवर होतो आहे. या वर्षात मोटारसायकल, मोपेड अथवा स्कूटर्सचा अपघात होऊन अनेकांचा बळी गेला.
आकडेवारीवर नजर
वर्ष मयत
२०१८ ८३
२०१९ ८६
२०२० ९४