काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना जिवे मारण्याची धमकी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 12, 2024 02:06 PM2024-03-12T14:06:16+5:302024-03-12T14:13:50+5:30
आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला.
जालना : येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांना मोबाइलवर कॉल करून अज्ञात व्यक्तीने जिवे मारण्याची धमकी दिली. ही घटना सोमवारी सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास मुंबई येथे घडली.
जालना येथील काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल हे कामानिमित्त मुंबई येथे गेले आहेत. सोमवारी सकाळी ११ वाजता आमदार गोरंट्याल यांच्या मोबाइलवर इंटरनॅशनल नंबरवरून कॉल आला. आपण आमदार बोलता का? कैलास गोरंट्याल बोलता का? अशी विचारणा केली. आमदार गोरंट्याल यांनी ओळख सांगताच संबंधित व्यक्तीने त्यांना शिवीगाळ करून 'तुझा मुडदा पाडतो' असे म्हणत जिवे मारण्याची धमकी देत फोन बंद केला. या घटनेनंतर आमदार गोरंट्याल यांनी मुंबई पोलिस आणि जालन्याचे पोलिस अधीक्षक अजयकुमार बंसल यांना माहिती दिली. तसेच मुंबई पोलिसांत तक्रार करणार असल्याचे आमदार गोरंट्याल यांनी सांगितले.
दरम्यान, आमदार गोरंट्याल यांना धमकी दिल्याचे समजताच संतप्त काँग्रेसच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सदर बाजार पोलिस ठाणे गाठून या प्रकाराची चौकशी करावी, दोषींना अटक करावी, आमदार गोरंट्याल यांच्या सुरक्षेत वाढ करावी, अशी मागणी केली आहे. यावेळी शहर काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष शेख मेहमूद, महावीर ढक्का, विनोद यादव, किशोर गरदास, विनोद रत्नपारखे, संजय भगत, नंदा पवार, दीपक भुरेवाल, सुरेश चव्हाण, योगेश पाटील, रवींद्र राजन, योगेश भगत, विकी वाघमारे, संजय पाखरे, दावीद गायकवाड, बापू साळवे, दत्ता घुले, शेख लतिफ, गणेश चांदोडे, सुशील चित्राल आदींची उपस्थिती होती.