लोकमत न्यूज नेटवर्कजालना : समाज बांधवांशी सविस्तर चर्चा केल्यानंतरच आपण आपला निर्णय जाहीर करणार असल्याची माहिती अपक्ष आ. अब्दुल सत्तार यांनी सोमवारी येथे आयोजित पत्रकार परिषदेत दिली.येथील नॅशनल महाविद्यालयात आ. सत्तार यांच्या उपस्थितीत मुस्लिम समाज बांधवाच्या मेळाव्याचे आयोजन केले होते. यावेळी ते म्हणाले की, आजही आपण नेते म्हणून माजी मुख्यमंत्री तथा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अशोक चव्हाण यांनाच मानतो. परंतु माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्या अनेक चुकीच्या निर्णयामुळे काँग्रेसची पिछेहाट झाल्याचा गंभीर आरोपही सत्तार यांनी यावेळी केला. औरंगाबादेत आपण अपक्ष उमेदवार हर्षवर्धन जाधव यांना पाठिंबा जाहीर केला आहे, ते कसे असे विचारले असता, ते आपल्या जिल्ह्यातील असून, त्यांचे आणि आपले पारिवारिक संबंध आहेत. त्यामुळेच आपण त्यांना औरंगाबादेत निवडून आणण्यासाठी मदत करणार असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. काँग्रेसला पाठिंब्याचे काय असे विचारले असता, जालना लोकसभा मतदारसंघात कोणाला मदत करायची हे अद्याप ठरले नाही. त्याच विषयावर चर्चा करण्यासाठी आपण हा समाजाचा मेळावा आणि चर्चासत्राचे आयोजन केल्याचे सत्तार म्हणाले.यावेळी त्यांच्या सोबत अब्दुल रशीद यांच्या उपस्थितीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले होते.
समाजबांधवांच्या भावना जाणून घेतल्यावर निर्णय- सत्तार
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 16, 2019 12:52 AM