- पवन पवार
वडीगोद्री ( जालना) : मुख्यमंत्र्यांच्या सहमतीने ओबीसी आरक्षण संपवण्याचा शासनाचा घाट असून लोकनियुक्त सरकार राज्यघटनेशी धोका करत आहे, असा सनसनाटी आरोप ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी आज केला. तसेच तुम्ही राज्यातील १२ कोटी जनतेचे प्रतिनिधी की एका विशिष्ट समाजाचे? असा सवाल देखील हाके यांनी केला.
ओबीसी आरक्षण बचावसाठी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांच्या वडीगोद्री येथील बेमुदत उपोषणाचा आजचा सहावा दिवस आहे. हाके यांनी सकाळी पत्रकारांशी संवाद साधला. यावेळी हाके म्हणाले, सगेसोयरेचा अध्यादेश लागू झाला तर फक्त ओबीसी बाधित होत नाही, तर एससी आणि एसटी यांच्या आरक्षणावर पण गदा येते. शासन जोपर्यंत ओबीसी आरक्षणाला धक्का लागत नाही हे सांगत नाही तोपर्यंत हे उपोषण सुरू राहणार, असा पुनरोच्चार देखील हाके यांनी केला.
सरकारने लेखी द्यावंओबीसी आरक्षणाला कसा धक्का लागत नाही ? हे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री यांनी आम्हाला सांगावा. तसे उत्तर लेखी द्यावे. ओबीसीच्या आंदोलनाकडे फिरकत नाही, तर दुसरीकडे जरांगे यांच्या आंदोलनाला रेड कार्पेट घालता, अशी टीकाही हाके यांनी यावेळी केली.
जरांगे यांनी कायदा तोडला नाही का?आम्ही कोणत्या नेत्याला टार्गेट केलं नाही. आम्ही कायदा तोडून काहीही केलं नाही. यांना ओबीसी कोण हे माहिती आहे का ? अशी टीका हाके यांनी मराठा आरक्षण नेते मनोज जरांगे यांच्यावर केली. तसेच माझ्या समोर चर्चेला बसावे, मी सर्व उत्तरे देतो असे खुले आव्हान देखील जरांगेंना यावेळी हाके यांनी दिले. भुजबळांना टार्गेट करून धनगर जवळ करण्याचा प्रयत्न जरांगे करत आहे. जरांगे यांनी कायदा तोडला नाही का?? असा सवाल ही हाके यांनी केला. ओबीसी म्हणून आम्ही महाराष्ट्रात एक नाहीत म्हणून यांचं फावल आहे. आमचं ओबीसीचा संघटन जर असत तर आमच्या आरक्षणाकडे पाहण्याचा दृष्टिकोन असा नसता अशी खंत हाके यांनी व्यक्त केली.
राजेश टोपे यांच्यावर टीकाशरद पवार देशाचे नेते आहेत. तेवढ्या मोठ्या नेत्याकडून मी अपेक्षा नाही करत. मी त्यांच्या भागातला आहे. किमान ज्या भागात आंदोलन करत आहे त्या भागातील लोकप्रतिनिधीने फोन तरी करायला हवा, असा टोला आमदार राजेश टोपे यांना हाके यांनी लगावला.