होंडे यांचा गौरव
अंबड : अंबड - घनसावंगी वकील संघाच्या कोषाध्यक्षपदी साडेगाव येथील ॲड. प्रदीप होंडे यांची निवड करण्यात आली आहे. याबद्दल राज्याचे आरोग्यमंत्री रोजेश टोपे यांनी त्यांचा गौरव केला. वकील संघाकडूनही त्यांचे अभिनंदन करण्यात आले.
मोकाट जनावरांचा उपद्रव; शेतकरी त्रस्त
बदनापूर : तालुक्यातील वाकुळणीसह परिसरात गेल्या काही दिवसांपासून मोकाट जनावरांचा उपद्रव वाढला आहे. ही जनावरे रब्बी पिकांचे नुकसान करत असल्याने शेतकऱ्यांमधून चिंता व्यक्त केली जात आहे. विशेष म्हणजे अनेक शेतकरी रात्री पिकांची राखण करण्यासाठी शेतात जात आहेत.
धनगर समाजाचा मोर्चा
जालना : मागील अनेक दिवसांपासून शासन स्तरावर प्रलंबित असलेल्या मागण्यांसंदर्भात धनगर समाजाच्या वतीने २४ जानेवारी रोजी मोर्चा काढण्यात येणार आहे. जिल्ह्यातील धनगर समाजबांधवांनी या मोर्चात सहभागी व्हावे, असे आवाहन संयोजकांनी केले आहे.
राज्याभिषेक सोहळा
परतूर : तालुक्यातील आसनगाव येथे छत्रपती राजे संभाजी महाराज यांचा राज्याभिषेक सोहळा दिन संभाजी मित्रमंडळाच्यावतीने साजरा करण्यात आला. यावेळी मित्रमंडळाचे अध्यक्ष रामेश्वर खरात, मच्छींद्र खरात, भागवत खरात आदी उपस्थित होते.
अतुल लढ्ढा यांचा औरंगाबादेत सन्मान
जालना : लायन्स क्लब इंटरनॅशनल डिस्ट्रिक्ट ३२३४ एच २ची कॅबिनेट बैठक नुकतीच औरंगाबादेत झाली. यावेळी लॉ. अतुल लढ्ढा यांचा लॉ. डॉ. नवल मालू यांनी इंटरनॅशनल पिन देऊन गौरव केला. लायन्स इंटरनॅशनल क्लब ही १०४ वर्षांहून जुनी सेवाभावी संस्था असून, ती २१० देशांमध्ये कार्यरत असल्याची माहिती देण्यात आली.
दिव्यांगांना मोफत कृत्रिम अवयवांचे वाटप
अंकुशनगर (महाकाळा) : कर्मयोगी अंकुशराव टोपे समर्थ साखर कारखाना व साधू वासवानी मिशन (पुणे) यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित केलेल्या कार्यक्रमात दिव्यांगांना कृत्रिम अवयवांचे मोफत वाटप करण्यात आले. यात हात, कुबडी, काठी, हात व पायांच्या पंज्याचा समावेश आहे.
पाथरवाला बुद्रुक, कुरण गावात जल्लोष
अंबड : तालुक्यातील पाथरवाला बुद्रुक व कुरण या ग्रामपंचायतींच्या निवडणुकीत कर्मयोगी अंकुशराव टोपे पॅनेलने विजय मिळवला आहे. त्यामुळे निवडणूक निकालानंतर कार्यकर्त्यांसह उमेदवारांनी जल्लोष साजरा केला. टोपे ग्रामविकास पॅनेलचे सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले तर सात उमेदवारांनी निवडणुकीत विजय मिळवला आहे.
दहा जागांवर विजय
जाफराबाद : तालुक्यातील वरुड बुद्रुक येथील ग्रामपंचायत निवडणुकीत भाजप व मित्रपक्ष पॅनेलने दहा जागांवर विजय मिळवला, तर शिवसेनेच्या पॅनेलला तीन जागा मिळविण्यात यश आले आहे. गावात १३ जागांसाठी ३० उमेदवारांनी नामनिर्देशन पत्र भरले होते. विशेष म्हणजे या सर्वच उमेदवारांनी निवडणूक लढवली होती.
मार्गदर्शन कार्यक्रम
अंबड : तालुक्यातील मठ पिंपळगाव येथील मत्स्योदरी महाविद्यालयात मकर संक्रात व विद्यापीठ नामविस्तार दिनानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात प्रा. दिगांबर दाते यांनी मार्गदर्शन केले. यावेळी मुख्याध्यापक राहुल भालेकर, डॉ. सुहास सदाव्रते, सुनील पवार यांच्यासह शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.
आंतरवाला परिसरात वाहनांच्या रांगा
जालना : जालना - अंबड रस्त्यावरील आंतरवाला येथे मंगळवारी दुपारी वाहनांच्या लांबच-लांब रांगा लागल्या होत्या. यावेळी घनसावंगी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शिवाजी बंटेवाड येथून जात असताना वाहतूक खोळंबल्याचे त्यांच्या निदर्शनाला आले. यानंतर त्यांनी स्वत:च्या वाहनातून खाली उतरून वाहतूक सुरळीत केली.
वीजबिल माफीची शेतकऱ्यांकडून मागणी
जालना : कोरोना काळात अनेकांचा रोजगार गेला होता. मात्र, असे असतानाच लॉकडाऊन दरम्यान शेतीतील वीजबिलांसह घरगुती वीजबिले अव्वाच्यासव्वा देण्यात आलेली आहेत. ही वीजबिले वेळीच माफ करण्यात यावीत, अशा मागणीचे निवेदन जिल्हाधिकाऱ्यांना नुकतेच देण्यात आले. या निवेदनावर अनिल वानखेडे, सुंदरलाल सगट आदींच्या स्वाक्षऱ्या आहेत.