रूग्णसंख्येत वाढ
रामनगर : गत काही दिवसांपासून वातावरणात सतत बदल होत आहेत. बदलत्या वातावरणामुळे सर्दी, खोकल्यासह इतर आजराचे रूग्ण वाढले आहेत. परंतु, हे आजार कोरोनाची लक्षणे असल्याने अनेकजण अंगावर आजार काढत असल्याचे चित्र आहे.
पादचाऱ्यांची कसरत
जालना : शहरांतर्गत भागात मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. ही जनावरे रस्त्यावर ठाण मांडत असल्याने वाहतूक कोंडी होत आहे. शिवाय पादचारी नागरिकांना याचा नाहक त्रास सहन करावा लागत आहे. पालिकेने लक्ष देऊन या मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी होत आहे.
अपघातात वाढ
बदनापूर : तालुक्यातील ग्रामीण भागातील रस्त्यांची मोठी दुरवस्था झाली आहे. खराब रस्त्यांमुळे वाहन चालकांना कसरत करीत वाहने चालवावी लागत असून, अपघाताचा धोकाही वाढला आहे. ही बाब पाहता संबंधितांनी रस्त्यांची दुरूस्ती करावी, अशी मागणी होत आहे.
धोकादायक विद्युत डीपी
जालना : शहरांतर्गत प्रमुख मार्गाच्या कडेला असलेले विद्युत डीपी सताड उघडे राहत आहेत. उघड्या डीपीमुळे अपघाताचा धोका निर्माण झाला आहे. ही बाब पाहता संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देऊन उघडे डीपी कुलूपबंद ठेवावेत, अशी मागणी होत आहे.