रस्त्याची दुरवस्था
जालना : कुक्डगाव ते ताडहादगाव या रस्त्याची गेल्या काही दिवसांपासून मोठी दुरवस्था झाली आहे. या रस्त्यावर जागोजागी खड्डे पडले असून, वाहनचालकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. या रस्त्याची वेळीच दुरूस्ती करण्यात यावी, अशी मागणी ग्रामस्थांमधून होत आहे.
महिलांचा अनोखा उपक्रम
जालना : शहरातील सरस्वती कॉलनीतील महिलांनी संक्रांतीनिमित्त आयोजित केलेल्या हळदी- कुंकू कार्यक्रमानिमित्त जमा झालेला निधी अयोध्यातील श्रीराम मंदिरासाठी दिला आहे. यावेळी अरूणा जाधव, श्वेता बर्दापूरकर, आश्विनी कुलकर्णी, वर्षा ढोबळे, डॉ. स्वाती देशमुख, अर्पणा पळशीकर आदी उपस्थित होत्या.
स्वच्छता मोहीम
चंदनझिरा : येथील परिसरात स्वच्छता मोहीम राबविण्यात आली. आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगिता गोरंट्याल यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम झाला. यावेळी सभापती हरेश देवावाले, गणेश राऊत, सतीश जाधव, संजय वाघमारे आदी उपस्थित होते.
भुजंग यांचा गौरव
राजूर : जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समिती (दिशा) या जिल्हा समितीवर सदस्य म्हणून राजूर येथील भाऊसाहेब भुजंग यांची निवड झाली आहे. याबद्दल त्यांचा गावात सत्कार करण्यात आला. यावेळी रामेश्वर सोनवणे, गजानन नागवे, रतन ठोंबरे आदी उपस्थित होते.
सरपंचपदाच्या आरक्षण सोडतीकडे लक्ष...
देळेगव्हाण : नव्याने निवडणूक झालेल्या ग्रामपंचायतींच्या सरपंचपदाचे आरक्षण २८ जानेवारी रोजी पडणार आहे. या अनुषंगाने नेमके गावातील आरक्षण कोणत्या प्रवर्गासाठी निघते? याबाबत ग्रामस्थांमधून तर्क- वितर्क लढविले जात आहेत. जाफराबाद तालुक्यात अनेक ग्रामपंचायतींमध्ये चुरशीच्या लढती झाल्याने सरपंच पदाकडे आता ग्रामस्थांचे लक्ष लागून आहे.
रामनगर येथे निधी संकलन शोभायात्रा
जालना : अयोध्या येथे बांधण्यात येत असलेल्या श्रीराम मंदिराच्या उभारणीमध्ये सर्वांचा खारीचा वाटा असावा, यासाठी गावोगाव निधी संकलन शोभायात्रा काढली जात आहे. याच अनुषंगाने रामनगर (ता. जालना) येथेही निधी संकलन यात्रेचे आयोजन नुकतेच करण्यात आले होते. या यात्रेत ग्रामस्थ सहभागी झाले होते.
रामसगावातील शुभम भोजने याचे यश
घनसावंगी : तालुक्यातील रामसगाव येथील शुभम भोजने याची भारतीय सैन्य दलाच्या सीमा सुरक्षा दलात निवड झाली आहे. याबद्दल गाव परिसरातून त्याचे अभिनंदन होत आहे. शुभमने मिळवलेले हे यश इतर विद्यार्थ्यांसाठी प्रेरणादायी आहे. शुभम लहानपणापासूनच हुशार असल्याची माहिती देण्यात आली.