जालना: शेतीच्या फेरफारची नोंद घेण्यासाठी दीड हजार रुपये आणि दारूच्या कॉर्टरची लाच स्वीकारण्याची तयारी दर्शविणाऱ्या तलाठी आणि त्यांच्या सहाय्यकास एसीबी पथकाने आज ताब्यात घेतले. तलाठी कैलास खंडुजी ढाकणे ( 56, तलाठी सजा निरखेडा , तहसील कार्यालय जालना. रा. रायगडनगर जालना ) आणि त्यांचा सहाय्यक सुदर्शन दादाराव वाडेकर ( 34, रा. जामवाडी ता.जि. जालना) अशी आरोपींची नावे आहेत.
याबाबत अधिक माहिती अशी की, तक्रारदार यांनी मौजे निरखेडा शिवारात गट क्रमांक 109 मधील 24 आर शेती विकत घेतली आहे. सदर शेत जमिनीचे फेर नोंद घेण्यासाठी तक्रारदारास तलाठी कैलास खंडुजी ढाकणे याने 2,000/- रुपये लाचेची मागणी केली. तडजोडी अंती 1500/- रुपये लाचेची रक्कम स्वीकारण्याचे मान्य केले. तसेच खाजगी इसम सुदर्शन दादाराव वाडेकर याने तक्रारदाराकडे तलाठी ढाकणेसाठी विदेशी दारूच्या कॉर्टरची मागणी केली. लाच देण्याची इच्छा नसल्याने तक्रारदाराने एसीबीआकडे तक्रार दिली. पथकाकडून तक्रारीची पडताळणी करण्यात आली. दरम्यान, आज शुक्रवारी तलाठी ढाकणे याने तक्रारदार यांच्याकडून लाचेची रक्कम आणि दारू स्वीकारण्याची तयारी दर्शवली. यावरून एसीबीने तलाठी ढाकणे आणि खाजगी इसमास ताब्यात घेतले. याप्रकरणी कदिम पोलीस ठाणे येथे गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया चालू आहे.
ही कारवाई अपर पोलीस अधीक्षक, संदीप आटोळे, अपर पोलीस अधीक्षक मुकुंद आघाव, पोलीस उप अधीक्षक, किरण बिडवे यांच्या मार्गदर्शनाखाली सापळा अधिकारी पोलिस निरीक्षक शंकर म.मुटेकर, गजानन कांबळे, अतिश तिडके , गजानन खरात, गजानन घायवट,संदीपान लहाने यांच्या पथकाने केली.