जालना : वार्षिक लेखा परीक्षणाचा अहवाल चांगला देण्यासाठी जालना स्थानिक निधी लेखा विभागातील सहायक लेखा परीक्षकास ३५ हजारांची लाच स्वीकारताना औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुरुवारी ताब्यात घेतले आहे. मारुती हुलाजी पपुलवार (४७) असे संशयिताचे नाव आहे.
मारुती पपुलवार याने तक्रारदाराच्या कार्यालयाचे वार्षिक लेखा परीक्षण केले आहे. त्याच्या अहवालामध्ये लेखा आक्षेप मुद्दा न काढता चांगला अहवाल देण्यासाठी सहायक लेखा परीक्षकाने ३५ हजार रुपयांच्या लाचेची मागणी केली. तक्रारदाराला लाच देण्याची इच्छा नसल्याने त्याने याची तक्रार औरंगाबाद येथील लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे केली.
या तक्रारीनंतर पथकाने गुरुवारी सापळा लावून मारुती पपुलवार याला ३५ हजार रुपयांची लाच स्वीकारताना ताब्यात घेतले आहे. ही कारवाई पोलिस अधीक्षक संदीप आटोळे, अपर पोलिस अधीक्षक विशाल खांबे, पोलिस उपअधीक्षक मारुती पंडित, पोलिस निरीक्षक संदीप राजपूत, केवलसिंग गुसिंगे, शिरीष वाघ, चांगदेव बागुल यांनी केली आहे.