लोकमत न्यूज नेटवर्कजालना : हमी भावाने खरेदी केलेली तूर ठेवण्यासाठी वखार महामंडळाकडे पुरेशी जागाच नसल्याने दोन दिवसांपासून जिल्ह्यात तूर खरेदी ठप्प आहे. अखेर अधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आला.जिल्हा मार्केटिंग विभागाच्या गोदामात यापुढे खरेदी केलेली ठेवण्यात येणार आहे. गुरुवारपासू तूर खरेदी सुरळीत होणार असल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले.जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रांवर चाळीस दिवसांत तीन कोटी रूपये किमतीची १० हजार क्विंटल तूर खरेदी करण्यात आली आहे. जालना, भोकरदन, आष्टी, अंबड, वडीगोद्री येथील शासकीय गोदामात गेल्यावर्षीची तूर ठेवण्यात आली आहे. त्यामुळे यंदा खरेदी केली जाणारी तूर ठेवावी कुठे, असा प्रश्न निर्माण झाला होता.जागेअभावी सोमवारपासून आठही केंद्रांवरील तूर खरेदी बंद करण्यात आली. अखेर नाफेडच साठा अधिकारी, जिल्हा मार्केटींग अधिकारी, जिल्हा उपनिबंधक, बाजार समितीचे सचिव यांची बैठक झाली. तूर ठेवण्याबाबत तोडगा काढण्यात आला. या बैठकीत जागेचा शोध घेण्यात येऊन जिल्हा मार्केटिंग विभागाचे गोदाम पर्याय म्हणून निश्चित करण्यात आले. जिल्हा मार्केटिग विभागाकडे असलेले वेअर हाऊस नाफेड तूर ठेवण्यााठी भाडेतत्वावर घेणार असल्याची माहिती अधिका-यांनी दिली.जालना, भोकरदन, आष्टी, वडीगोद्री येथील शासकीय वेअर हाऊसमध्ये १ लाख ४० हजार क्विंटल तूर पडून आहे. त्यातच जिल्ह्यातील आठ हमीभाव केंद्रांवर आत्तापर्यंत खरेदी केलेली १० हजार क्विंटल तुरीची त्यात भर पडली आहे. खरेदी केलेली तूर सिटी वेटर हाऊसमध्ये ठेवण्यात येत होती. मात्र त्यात जागाच शिल्लक नसल्याने हा तिढा निर्माण झाला होता. अधिकारी स्तरावर झालेल्या बैठकीत यावर तोडगा काढण्यात आल्याने तूर खरेदी सुरळीत होणार आहे.
पणन विभागाचे गोदाम घेणार भाडेतत्त्वावर...!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 12:45 AM