लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना पालिकेने मार्च महिना लागताच मालमत्ता कराची वसुली मोहीम वेगात सुरू केली आहे. यासाठी सात स्वतंत्र पथकांची नेमणूक करण्यात आल्याची माहिती देण्यात आली आहे. ज्यांच्याकडे पाच हजार रुपयांच्यावर थकीत कर असेल, अशाच्या मालमत्ता सील करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.जालना शहरातील जवळपास ५८ हजार मालमत्ताधारकांकडे ४२ कोटी पेक्षा अधिकचा कर गेल्या काही वर्षांपासून थकला आहे. तो वसूल करण्यासाठी जालना पालिकेने महत्त्व दिले आहे. एकूणच जालना पलिकेला हक्काचे उत्पन्न हे मालमत्ता कर वसुलीतून मिळते. त्यातच मध्यंतर करवाढ केल्याने यंदा या उत्पन्नात वाढ होणार आहे. जालना शहरातील धनदांगडे तसेच शासकीय कार्यालयांकडे कराची मोठी थकबाकी शिल्लक असल्याचे दिसून आले.यापूर्वी जवळपास २० मालमत्ता या जालना पालिकेने कर न भरल्याने स्वत:च्या नावावर करून घेतल्या असून, याची प्रक्रिया जिल्हाधिकाऱ्यांकडे सुरू असल्याची माहिती देण्यात आली. जालना पालिकेने कर वसुली विभागातील कर्मचाऱ्यांसह अन्य विभागातील कर्मचाऱ्यांनाही आपल्याकडे तात्पुरत्या स्वरूपात वर्ग केले आहे.प्रारंंभी बड्या थकबाकी दारांचा शोध घेऊन त्यांनी मालमत्ता कर भरावा म्हणून नोटीस देण्यात येणार आहे. नोटीस देऊनही जर कर भरला नाही, तर त्यांची मालमत्ता सील करण्याचा निर्णय घेण्यात येणार आहे.त्यामुळे नागरिकांनीत्यांच्याकडील थकबाकी तातडीने भरावी असे आवाहन जालना शहरात रीक्षा फिरवून करण्यात आल्याचे सांगण्यात आले.जालना शहरातील शासकीय तसेच निमशासकीय कार्यालयांकडे चक्क दोन कोटी रूपयांचा मालमत्ता कर थकला आहे. तो वसूलीसाठी आता त्यांना यापूर्वीच नोटिसा दिल्या आहेत. असे असतांनाही त्यांनी तो कर भरला नसल्याचे दिसून आले. एकट्या रेल्वे विभागाकडे चक्क २० लाख रूपये थकले असून, वेळोवेळी पाठपुरावा करूनही त्यांच्याकडून काहीच प्रतिसाद मिळत नसल्याचे सांगण्यात आले.
मालमत्ता कर वसुलीसाठी सात पथके तैनात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 04, 2019 12:24 AM