जालना : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस दलाच्या वतीने उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते. पैकी ७ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून इतर सराईत ४० गुन्हेगारांची माहिती संकलित करून ठाण्याच्या प्रभारींना देण्यात आले आहेत. संबंधितांच्या हद्दपारीचे प्रस्ताव पाठविण्याच्या सूचनाही देण्यात आल्या आहेत.लोकसभा निवडणुका शांततेत पार पाडण्यात महत्त्वाची भूमिका बजावणाºया जिल्हा पोलीस दलाने विधानसभा निवडणुकीसाठीही तगडा बंदोबस्त तैनात केला आहे. जिल्ह्यात ठिकठिकाणी चेकपोस्ट, नाकाबंदी करण्यात येत आहे. वाहनांची तपासणी केली जात असल्याने अवैध धंद्यांनाही लगाम लागला आहे. याचबरोबर कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी जुलै ते सप्टेंबर या कालावधीत जिल्ह्यातील सराईत गुन्हेगार असलेल्या ५४ जणांचे हद्दपारीचे प्रस्ताव पोलीस अधीक्षक व उपविभागीय अधिकाऱ्यांकडे पाठविण्यात आले होते.यात कलम ५५ मपोका नुसार तिघांना हद्दपार करण्यात आले आहे. कलम ५६ मपोका नुसार ३० जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यातील ९ जणांना हद्दपार करण्यात आले आहे. तर १७ प्रस्ताव उपविभागीय अधिकाºयांकडे प्रलंबीत आहेत. कलम ५७ मपोका नुसार २१ जणांचे प्रस्ताव पाठविण्यात आले होते. यातील एकाला हद्दपार करण्यात आले असून, २० प्रकरणे प्रलंबीत आहेत.पाठविलेल्या ५४ प्रकरणांपैकी इतर सराईत गुन्हेगारांचा अहवाल पोलीस अधीक्षक कार्यालयाकडून तपासण्यात आला होता. त्यानुसार ४० जणांची माहिती संकलित करून पोलीस ठाण्यांकडे पाठविण्यात आली आहे. संबंधितांच्या हद्दपारीचा प्रस्ताव तयार करून पाठविण्याच्या सूचना ठाणे प्रभारींना देण्यात आली आहे. याशिवाय विविध कलमान्वये प्रतिबंधात्मक कारवाईचे सत्रही हाती घेतले आहे.इशारा : कायदे मोडणाºयांवर कारवाई
विधानसभा निवडणुकीतील आदर्श आचारसंहितेचे पालन व्हावे, कायदा-सुव्यवस्था अबाधित रहावी, यासाठी पोलीस दलाच्या वतीने आवश्यक ती दक्षता घेतली जात आहे. राजकीय पदाधिकारी, कार्यकर्त्यांसह नागरिकांनी आदर्श आचारसंहितेचे पालन करावे, नियमांचे उल्लंघन करणाºयांवर कायदेशीर कारवाई केली जाईल.- एस. चैतन्य, पोलीस अधीक्षक, जालना