परतूर : ग्रामस्थांनी दाखविलेली एकी, ग्रामपंचायतीने केलेले नियोजन, सर्वपक्षीयांसह प्रशासकीय विभागाची मिळालेली साथ यामुळे कोरेगाव (ता.परतूर) हे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही गावात कोरोनाचा शिरकाव होऊ नये, यासाठी प्रयत्न केले जात आहेत.
कोरेगाव येथे कोरोनाचे १९ रुग्ण आढळले होते. मूळ गाव निम्न दुधना प्रकल्पात गेल्याने या गावचे पुनर्वसन झाले आहे. १२०० लोकसंख्या असलेल्या नवीन कोरेगाव वस्तीवर कोरोनाचा उद्रेक झाला होता. त्यामुळे गावच्या सीमा बंद करून आरोग्य विभागाकडून ग्रामस्थांची तपासणी करण्यात आली. सरपंच तथा पं.स सदस्य कांचन दादाराव खोसे, उपसरपंच रामेश्वर टेकाळे, ग्रामसेवक प्रकाश गजभारे, वैद्यकीय अधीक्षक डॉ. डी.आर. नवल, गटविकास अधिकारी सुरडकर, पोलीस निरीक्षक शामसुंदर कौठाळे, डाॅ. सय्यद जाहेद, विस्तार अधिकारी प्रवीण नाकले, ग्रामसेवक प्रकाश गजभारे यांच्यासह ग्रामस्थ, सर्वपक्षीयांनी एकत्रित काम केल्याने गाव कोरोनामुक्त झाले आहे.
कोरोनाच्या लढ्यात ग्रामस्थांनी दिलेली साथ महत्त्वाची ठरली आहे. गाव स्वच्छतेवर ग्रामपंचायतीने अधिकचा भर दिला. शिवाय सॅनिटायझर, मास्कचे वाटप करण्यात आले. नागरिकांची वेळोवेळी आरोग्य तपासणी करण्यात आली.
- कांचन दादाराव खोसे, सरपंच
गाव कोरोनामुक्त करण्यासाठी गावातील सर्वांचेच योगदान महत्त्वाचे आहे. प्रशासकीय विभागांनीही गावाकडे विशेष लक्ष देऊन उपाययोजना केल्या आहेत. गावातील लसीकरण वेळेत पूर्ण व्हावे, यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
-रामेश्वर टेकाळे, उपसरपंच
वरिष्ठांच्या सूचनेनुसार गावात विविध उपाययोजना राबविण्यात आल्या आहेत. ग्रामपंचायतीने राबविलेल्या उपाययोजना आणि सूचनांचे ग्रामस्थांनी पालन केले. त्यामुळे गाव कोरोनामुक्त झाले आहे. यापुढेही दक्षतेसाठी विविध उपाय राबविले जाणार आहेत.
-प्रकाश गजभारे, ग्रामसेवक
सर्वांच्या प्रयत्नातून कोरेगाव कोरोनामुक्त झाले आहे. असे असले तरी ग्रामस्थांनी सूचनांचे पालन करावे. वेळेत लसीकरण करून घ्यावे. -डॉ. डी. आर. नवल,
तालुका आरोग्य अधिकारी
ग्रामपंचायतीने असे केले प्रयत्न
बाधित रूग्ण आढळल्यानंतर गावाच्या सीमा बंद करण्यात आल्या. संपर्कातील ग्रामस्थांचा शोध घेऊन उपचार करण्यात आले.
ग्रामस्थांच्या वेळोवेळी बैठका घेऊन जनजागृती करण्यात आली. कोरोनाच्या लढ्यात आजवर गावात ८० टक्के लसीकरणही पूर्ण झाले आहे.