जालना / वडिगोद्री : अंतरवाली सराटी येथील लाठीहल्ला, गोळीबारीचे आदेश देणाऱ्यांना तातडीने निलंबित करावे, मराठा समाजाला आरक्षण कसे देणार, पुढचा टप्पा कसा असेल ते शासनाने तातडीने सांगावे, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. गोळ्या घालणे हे चूक आहे की बरोबर ते गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगावे, असा सवालही त्यांनी केला.
छत्रपती संभाजी महाराज यांनी शनिवारी सकाळी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांशी चर्चा केली. त्यावेळी उपोषणस्थळावरून ते बोलत होते. मनोज जरांगे हे निमित्त आहेत. किडण्या फेल असतानाही ते दरवर्षी आंदोलन करीत आहेत. सर्वोच्य न्यायालयाने आरक्षण रद्द केले आहे. मराठा समाजाला आरक्षण हवे असेल तर मराठा समाज सामाजिक मागास आहे हे सिद्ध होणे गरजेचे आहे. ते सिद्ध झाल्याशिवाय मराठा समाजाला आरक्षण मिळणार नाही. यासाठी शासनाने स्थापन केलेल्या समितीच्या किती बैठका झाल्या हे आम्हाला माहिती आहे. मुंबईत बसून दोन ओळी बोलून आता चालणार नाही. लहान मुलांना, वयोवृद्धांना छर्रे लागल्याने ते जखमी झाले आहेत. मुख्यमंत्री, गृहमंत्र्यांनी लाठीचार्जचे, गाेळीबारीचे आदेश देणाऱ्याला निलंबित करावे, समाजाला आरक्षण कोणत्या पद्धतीने देणार ते तातडीने जाहीर करावे, असे आवाहन छत्रपती संभाजी महाराज यांनी केले. आजचे मुख्यमंत्री असो किंवा माजी मुख्यमंत्री असोत सर्वजण समाजाची फसवणूक करीत आहेत. त्यामुळे गोळीबाराचा जो ठपका शासनावर बसला आहे तो पुसण्यासाठी शासनाने आता मराठ्यांना आरक्षण देवून न्याय मिळवून द्यावा. राज्यात आणि केंद्रात तुमचेच सरकार आहे. छत्रपती शिवाजी महाराज यांचे नाव घेवून राजकारण करा परंतु, आदिलशाही, निजामशाही पद्धतीने वागत असाल तर आम्ही ते खपवून घेणार नाही, असा इशाराही त्यांनी दिला. आंदोलन करणारे आंदोलक छत्रपती शिवाजी महाराजांचे खरे वारसदार आहेत. या आंदोलनात मनाेज जरांगे जी भूमिका घेतील, त्याला आपला आणि बहुजन समाजाचा पाठींबा असल्याचेही छत्रपती संभाजी महाराज यांनी सांगितले.
जरांगे यांना आश्रु अनावर
छत्रपती संभाजी महाराज यांनी अंतरवाली सराटी येथील आंदोलकांसह जखमी महिला, वयोवृद्धांसह नागरिकांची चौकशी केली. शिवाय आंदोलनस्थळी ते भूमिका मांडत असताना आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांना आश्रू अनावर झाले होते. त्यावेळी आता रडायचं नाही लढायचं असे छत्रपती संभाजी महाराज म्हणताच उपस्थितांनी छत्रपती शिवाजी महाराज की जय, एक मराठा लाख मराठा अशी घोषणाबाजी केली.