जालना : आषाढी यात्रेनंतर पंढरपूरहून परतीच्या मार्गावर असलेली संत गजानन महाराजांची पालखी शनिवारी सायंकाळी जालन्यात दाखल झाली. या पालिखीतील वारकऱ्यांची शिस्त ही लक्षणीय होती. हातात भगवे ध्वज आणि मुखी गजानन आणि विठ्ठलाचे नाम यामुळे जालन्यातील वातावरण भक्तीमय झाले होते. अंबड येथून आज या पालखीचे आगमन झाले.अंबड चौफुलीवर या पालखीचे जल्लोषात स्वागत करण्यात आले. यावेळी नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, उपनगराध्यक्ष राजेश राऊत, संजय देठे यांनी परंपरागत पद्धतीने स्वागत करून दर्शन घेतले. अंबड चौफुलीवरून ही पालखी शनि मंदिर, कचेरी रोड, गणपती गल्ली, शास्त्री मोहल्ला, आनंदी स्वामी गल्ली मार्गे गांधी चमन येथील संस्थान काळुंका माता मंदिरात पोहोचली. काळुंका माता मंदिरात या पालखीचा जालन्यातील पहिला मुक्काम असतो. दुसºया दिवशी ही पालखी बजरंग दाल मिलमध्ये मुक्कामासाठी असते.शनिमंदिर परिसरात पालखीच्या आगमनापूर्वी महिलांनी रस्त्यांवर सडा टाकून आकर्षक रांगोळ्यांनी रस्ते सजवले होते. अनेक ठिकाणी वारकऱ्यांना चहापान आणि फराळाची व्यवस्था करण्यात आली होती. ठिकठिकाणी संत गजानन महाराजांचे औक्षण करण्यात आले. यावेळी महिला, पुरूषांनी दर्शनासाठी रांगा लावून गर्दी केली होती. पावसाच्या सरींनी उत्साही वातावरण होते.
टाळ-मृदंगाच्या तालाने भक्तीमय वातावरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 28, 2019 12:29 AM