जालना : गुरूवारी सकाळी ८ वाजण्यापूर्वीच्या २४ तासात जिल्ह्यात सरासरी २३.३० मिमी पाऊस झाला. जिल्ह्यातील सहा महसूल मंडळात अतिवृष्टी झाली असून, बदनापूर तालुक्यातील रोषणगाव महसूल मंडळात तब्बल २०७ मिमी पाऊस झाला. ढगफुटी झाल्याने या भागातील नद्यांना पूर आला असून, शेतशिवाराला तळ्याचे स्वरूप आले आहे.
गत आठ-दहा दिवसांपासून जिल्ह्यात पावसाने उघडीप दिली होती. मात्र, गुरूवारी पहाटेच्या सुमारास जिल्ह्यात सर्वदूर पावसाने हजेरी लावली. गत २४ तासात बदनापूर तालुक्यात सर्वाधिक ७६.२० मिमी पाऊस झाला. यात रोषणगाव महसूल मंडळातच २०७ मिमी पावसाची नोंद झाली. तर सेलगाव महसूल मंडळात ६७ मिमी पाऊस झाला. बदनापूर महसूल मंडळात ३०, दाभाडी महसूल मंडळात ४३ तर बावणे पांगरी महसूल मंडळात ३४ मिमी पाऊस झाला. अंबड तालुक्यातही दमदार पावसाने (७०.५७ मिमी) हजेरी लावली. अंबड महसूल मंडळात ५५ मिमी, जामखेड महसूल मंडळात १२९ मिमी, धनगरपिंपरी महसूल मंडळात ८८ मिमी, रोहिलागड महसूल मंडळात ११५ मिमी तर सुखापुरी महसूल मंडळात ७५ मिमी पाऊस झाला.