- फकिरा देशमुख
भोकरदन : येथील शिवभोजन केंद्रात मंगळवारी लाभार्थ्यांना नियमित थाळी सोबत धोंड्याचा पाहुणचार मिळाल्याने सुखद धक्का बसला. नियमित थाळीसोबत पुरणपोळी व धोंड्याचे जेवण देत केंद्र चालकाने सामाजिक बांधिलकी जपली असल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे.
शिवभोजन थाळीने कोरोना काळामुळे झालेल्या लॉकडाऊनमध्येही अनेक गरजवंतांची भूक भागवली आहे. सध्या धोंड्याचा महिना सुरू आहे. त्यामुळे सर्वत्र धोंड्याचा पाहुणचार देणे सुरु आहे. गरिबांना सुद्धा असा पाहुणचार मिळावा म्हणून केंद्रात नेहमीच्या जेवणासोबत पुरण पोळी, खीर व धोंडा असे जेवण देण्याचा अनोखा उपक्रम येथील केंद्र चालक साहेबराव बारोकर यांनी राबवला. लाभार्थ्यांचा चेहऱ्यावरील आनंद पाहून समाधान लाभल्याचे केंद्र चालक बारोकर यांनी सांगितले. थाळी केंद्रात धोंड्याचा पाहुणचार मिळाला याचा खूप आनंद झाला. या पूर्वी कधीही धोंड्याचे जेवण खाण्याचा योग आला नव्हता असे मनोगत लाभार्थी बन्सीधार कचके यांच्यासह अनेकांनी व्यक्त केले.
प्रशासनाकडूनही कौतुक उपजिल्हाधिकारी शिवकुमार स्वामी यांनी येथे भेट देऊन गरिबांना देण्यात आलेल्या या पाहुणचाराबद्दल समाधान व्यक्त केले. तसेच या नाविन्यपूर्ण उपक्रमाची माहिती मिळताच प्रशासनाकडून तहसीलदार संतोष गोरड यांनी कौतुक केले आहे.