जालना : पोलीस दलाने मागे न राहता गुन्ह्यांच्या अचूक तपासासाठी उपलब्ध तंत्रज्ञानाचा प्रभावी वापर करण्यावर भर द्यावा, असे आवाहन औरंगाबाद परिक्षेत्राचे विशेष पोलीस महानिरीक्षक मिलिंद भारंबे यांनी केले.जिल्हा पोलीस दलाच्या वार्षिक तपासानिमित्त मंगळवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील सभागृहात आयोजित गुन्हे आढावा बैठकीत ते बोलत होते. पोलीस अधीक्षक रामनाथ पोकळे, अप्पर पोलीस अधीक्षक लता फड, पोलीस उपअधीक्षक (गृह) अभय देशपांडे, गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक राजेंद्रसिंह गौर, उपविभागीय पोलीस अधिकारी सचिन बारी, विशेष कृती दलाचे यशवंत जाधव यांच्यासह सर्व पोलीस ठाण्यांचे अधिकारी या वेळी उपस्थित होते.महानिरीक्षक भारंबे म्हणाले की, सायबर गुन्हेगारी वाढत आहे. त्यामुळे पोलीस दल स्वीकारत असलेल्या नवतंत्रज्ञानाचा वापर प्रभावीपणे करणे आवश्यक ठरणार आहे. महत्त्वाच्या गुन्ह्यांचा तपास, महापोलीस अॅप, आॅनलाइन तक्रारी, सीसीटीएनएस यंत्रणा, आयबाईक कार्यपद्धती याचाही महानिरीक्षकांनी आढावा घेतला. सकाळी पोलीस कवायत मैदानावर झालेल्या पोलीस दरबारात पोलीस अधिकारी व कर्मचा-यांच्या अडीअडचणी त्यांनी जाणून घेतल्या. वार्षिक तपासणीमध्ये महानिरीक्षक बुधवारी पोलीस अधीक्षक कार्यालयातील कामकाजाचा आढावा घेणार असून, गुुरुवारी भोकरदन तालुक्यातील पोलीस दलाच्या कामकाजाचा आढावा टेंभूर्णी पोलीस ठाण्यात घेतला जाणार आहे.---------------महानिरीक्षकांकडून परेडचे कौतुकसकाळी पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर पोलीस महानिरीक्षकांनी सेरेमोनियल परेडचे निरीक्षण केले. या वेळी पोलीस कर्मचा-यांनी पोलीस तुकडी संचलन, दरोडा कारवाई, प्रशिक्षण पद्धती, पीटी परेड, लाठी कवायत, गार्ड रिलिफ, रायफल कवायत, दंगा नियंत्रण कारवाई याचे निरीक्षक केले. पोलीस पथकांनी केलेले सादरीकरण व दंगल नियंत्रण प्रात्यक्षिकांचे पोलीस महानिरीक्षकांनी कौतुक केले.
गुन्ह्यांच्या तपासात तंत्रज्ञानाचा वापर महत्त्वाचा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 06, 2017 12:36 AM