जालना : महाराष्ट्रातील सरसकट मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र देत ओबीसीतून आरक्षण द्यावे, हीच आमची प्रमुख मागणी आहे. आरक्षणासाठीच आम्ही मुंबईच्या दिशेने जाणार असून, आमचे ध्येय आरक्षण आहे. आरक्षण घेतल्याशिवाय आता माघारी येणार नाही, असा इशारा मराठा आरक्षण आंदोलनाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी दिला.
आरक्षणासाठी मराठा समाजाचे शांततेत आंदोलन सुरू आहे. शांततेत असणाऱ्या या आंदोलनाला शासनाने परवानगी द्यावी. परवानगी दिली नाही तरीही आम्ही मुंबईत आंदोलन करणार आहोत. महाराष्ट्रातील घराघरातील मराठे या आंदोलनासाठी येणार आहेत. आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन सुरू राहणार आहे. त्यामुळे कपडे, अन्नपदार्थांसह इतर वस्तू नेण्यासाठी ट्रॅक्टर, ट्रॉली लागणार आहे. यामुळे शासनाने वाहने अडवू नयेत. वाहने अडविली तरी आम्ही आंदोलन करणार. गुन्हे दाखल झाले तरी जातीसाठी आम्ही गुन्हे अंगावर घेवू, असे जरांगे पाटील म्हणाले.
मुंबईतील मैदान पाहण्यासाठी शिष्टमंडळ गेले आहे. मुंबईतील मराठा समाज बांधव, शिष्टमंडळ जे मैदान ठरवितील तेथे आंदोलन केले जाईल. २० जानेवारी रोजी अंतरवालीतून आम्ही निघणार आहोत. मुंबईकडे पायी जाणार आहोत. त्यामुळे चार दिवस लागतील की जास्त दिवस ते सांगता येणार नाही. ज्येष्ठ मंडळीही पायी चालणार आहेत. त्यामुळे त्यांच्या आरोग्याची काळजी घेतच आम्ही मुंबई गाठून आरक्षण मिळेपर्यंत आंदोलन करणार असल्याचेही जरांगे पाटील म्हणाले.
मराठवाड्यात कमी नोंदीकाही जातीवादी अधिकाऱ्यांमुळे मराठवाड्यात कमी नोंदी सापडल्या आहेत. त्यामुळे समितीने मराठवाड्यात, महाराष्ट्रात पुन्हा काम करावे. हैदराबादला जावून कागदपत्रांची पडताळणी करावी, अशी मागणी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन यांच्याकडे केली आहे. आम्हाला मुंबईत जाण्याची हौस नाही. त्यापूर्वीच शासनाने आमच्या मागणीनुसार आरक्षण द्यावे, अशी मागणीही जरांगे पाटील यांनी केली.