लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात तीव्र दुष्काळी परिस्थिती निर्माण झाली आहे. त्यामुळे जिल्ह्यात तीव्र पाणीटंचाई भासत आहे. जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्नही गंभीर असून, प्रशासनाच्या वतीने अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आल्या नाही. अनेक गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई भासत असताना त्या गावांना फक्त एक टॅकर सुरु करण्यात आले आहे. दुष्काळाबाबत प्रशासन उदासीन दिसत असल्याचा आरोप शनिवारी झालेल्या जिल्हा परिषदेच्या स्थायी समितीच्या सभेत सदस्यांनी केला.यावेळी जि.प. अध्यक्ष अनिरुध्द खोतकर, उपाध्यक्ष सतीश टोपे, मुख्य कार्यकारी अधिकारी निमा अरोरा, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी मुकीम देशमुख, वित अधिकारी चव्हाण, अतिरिक्त मुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, सर्व सभापती यांची उपस्थिती होती.सभेची सुरुवात राष्ट्रगीताने करण्यात आली. त्यानंतर लगेचच सदस्य शालीकराम म्हस्के यांनी दुष्काळाचा मुद्दा उपस्थित केला. ते म्हणाले की, मागील तीन ते चार सभेत दुष्काळावर चर्चा करण्यात आली. ज्या गावांना तीव्र पाणीटंचाई आहे. अशा गावांना पाणी पुरवण्याच्या सूचना देखील सभागृहाच्या वतीने अधिकाऱ्यांना देण्यात आल्या होत्या. परंतु, जाफराबाद तालुक्यातील काही गावांमध्ये तीव्र पाणीटंचाई असतांना देखील तेथे एकाच टॅकरने पाणी पुरवठा करण्यात येत आहे. यातील अनेक गावांची लोकसंख्या ४ ते ५ हजार आहे. अशा ठिकाणी फक्त एकाच टॅकरने पाणीपुरवठा सुरु असल्याने पाण्यासाठी नागरिकांना भटकंती करावी लागत आहे. शासन निर्णयानुसार गावातील माणसे व जनावरांच्या संख्येनुसार गावांना पाणीपुरवठा करण्यात येतो, परंतु, त्यानुसार पाणी पुरवठा करण्यात येत नाही.विहिरी, बोअर कोरडेठाक पडल्याने नागरिकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. प्रशासन मात्र उदासिन दिसत असल्याचा आरोप त्यांनी केला. याबाबत संबंधित अधिका-याला विचारले असता, ते म्हणाले की, आम्ही गावाचीलोकसंख्या व जनावरांची लोकसंख्या तहसील कार्यालयकडे पाठविली होती. परंतु, त्यांनी जनावरांची संख्या काढा असे सांगून प्रस्ताव परत पाठवला होता. यावरुनच सभागृहात गोंधळ झाला. दरम्यान जिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण अथवा स्थायी सभेत अनेक महत्वाच्या विभागाचे अधिकारी सूचना देऊनही गैरहजर राहतात. त्यांच्याकडून खुलासा मागवून कारवाई करण्यावरही सभागृहात चर्चा झाली.अंबड येथील मत्स्योदरी मंदिरापासून तालुक्यातील काही गावांना पाणीपुरवठा करण्यात येत आहे. हे पाणी दूषित असून, यामुळे ज्या गावांना शासकीय टॅकरने पाणीपुरवठा करण्यात येत आहे. त्या गावातील अनेकजण आजारी पडले आहेत. हा अधिकाऱ्यांचा हलगर्जीपणा असून, नागरिकांच्या जिवाशी खेळ सुरु असल्याचा आरोप बाप्पासाहेब गोल्डे यांनी केला आहे. याबाबत संबंधित विभागाचे अधिकारी म्हणाले की, मला अशी काहीच कल्पना नाही. मी या पाण्याची तपासणी करत असल्याचे ते म्हणाले.युतीमुळे विरोधक झाले थंडराज्यात भाजप व शिवसेनेची युती झाली असल्याने जिल्हा परिषदेच्या विरोधी बाकावर बसलेले भाजपचे सदस्य थंड झाले असल्याचे पाहायला मिळाले. युती झाल्यानंतर ही जिल्हा परिषदेची पहिलीच सभा आहे. येरवी आक्रमक पवित्रा घेणारे भाजपचे सदस्य शनिवारी झालेल्या सभेत थंड पडलेले दिसले.सहा महिन्यांपासून लाभार्थी घरकुलाच्या प्रतीक्षेतविशेष निधीतून भोकरदन तालुक्यातील ५ लाभार्थ्यांना घरकुल देण्यात आले. त्यानंतर त्यांना घरेही पाडण्याचे सांगितले. परंतु, मागील सहा महिन्यापासून त्यांना निधी देण्यात आला नाही. हा निधी त्वरित देण्यात यावा, अशी मागणी सदस्या आशा पांडे यांनी केली आहे.आरोप : दुष्काळाबाबत जिल्हाधिका-यांच्या भूमिकेवर शंकादुष्काळी मुद्यावर चर्चा सुरु असताना सदस्य जयमंगल जाधव हे म्हणाले की, जिल्ह्यात दुष्काळी परिस्थिती असताना जिल्हाधिका-यांचे याकडे दुर्लक्ष आहे. जिल्हाधिका-यांची भूमिका दुष्काळाबाबत नकारात्मक असल्याचा आरोप त्यांनी यावेळी केला. याप्रसंगी सदस्य, अधिकारी व कर्मचा-यांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती. पाणी टंचाईच्या मुद्यावरही सभागृहात जोरदार चर्चा झाली. अनेक गावांमध्ये टँकरचे प्रस्ताव पाठवूनही ते मंजूर होण्यास विलंब होत असल्याचे सदस्यांनी सांगितले.
दुष्काळाच्या मुद्यावरून गाजली जि.प. सभा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 03, 2019 12:47 AM