आष्टी (जि.जालना) : दारू पिऊ देत नाही म्हणून एका इसमाने आईचा खून केल्याची घटना परतूर तालुक्यातील लोणी येथे गुरुवारी सकाळी १० वाजेच्या सुमारास घडली. रुंदावती यदाजी शिंदे (६०), असे मयत महिलेचे नाव आहे.
यदाजी अंबाजी शिंदे (६८) आणि त्यांची पत्नी रुंदावती (वय ६०) हे मागील अनेक वर्षांपासून लोणी येथे वास्तव्यास आहेत. यदाजी हे मंदिरात पुजारी म्हणून काम पाहतात, तर पत्नी रुंदावती यांना अर्धांगवायूचा त्रास असल्याने त्या आजारी होत्या. त्यांना दोन मुले व दोन मुली आहेत. दोन्ही मुलींचे पै पै जमा करून लग्न केले. दोन मुले सखाराम आणि भगवान यांना घासातला घास खाऊ घालून मोठे केले. सखाराम शिंदे हा दारू पिण्यासाठी गुरुवारी सकाळी घरातील तांदूळ व गहू विकण्यासाठी घेऊन जात होता. दारूसाठी तू धान्य विकायला का घेऊन चालला असे म्हणत रुंदावती यात्नी त्याला अडवले.
यामुळे सखारामला राग अनावर झाला. त्याने बांबूच्या काठीने आईला बेदम मारहाण केली. आरडाओरड ऐकताच शेजाऱ्यांनी धाव घेतली. मारहाणीत रुंदावती जखमी झाल्याने त्यांना आष्टी येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचारासाठी दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी तपासून त्यांना मयत घोषित केले. याप्रकरणी यदाजी अंबाजी शिंदे यांच्या फिर्यादीवरून मुलगा सखाराम शिंदे (३०) याच्यावर आष्टी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपी मुलास अटक करण्यात आली असून पुढील तपास सपोनि. एस.जे. नागवे करीत आहेत.