जालना : जालना लोकसभा मतदार संघातील महायुतीचे उमेदवार रावसाहेब दानवे आणि शिवसेना शिंदे गटाचे उपनेते माजी मंत्री अर्जुन खोतकर यांच्यातील अबोला महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांसाठी चिंतेचा विषय ठरला होता. परंतु, दानवे आणि खोतकर यांची शुक्रवारी सकाळीच गळाभेट झाली आणि कार्यकर्त्यांचा जीव भांड्यात पडला आहे.
२०१९ च्या निवडणुकीत अर्जुन खोतकर यांनी रावसाहेब दानवे यांच्या विरोधात शड्डू ठोकला होता. त्यावेळीही खोतकर यांचे मन वळविताना पदाधिकाऱ्यांना कसरत करावी लागली. वरिष्ठ नेतेमंडळींनी मध्यस्थी केल्यानंतर खोतकरांनी माघार घेत निवडणुकीच्या प्रचारात उडी घेतली होती. यंदाच्या निवडणुकीतही अशीच स्थिती निर्माण झाली होती. भाजपकडून शिवसेनेतील पदाधिकारी, कार्यकर्त्यांना मानसन्मान मिळत नसल्याने खोतकरांनी नाराजी व्यक्त केली होती. त्याशिवाय ही नाराजी योग्य ठिकाणी वर्तविल्याचे ते म्हणाले होते. परिणामी दानवे यांचा उमेदवारी अर्ज भरणे असो किंवा प्रचाराचा नारळ फोडणे असो या कार्यक्रमांना खोतकर आणि शिवसैनिकांची अनुपस्थिती होती.
खोतकर, दानवे यांच्यातील अबोला दूर व्हावा, यासाठी होणाऱ्या प्रयत्नांना यश येत नव्हते. अखेर शुक्रवारी सकाळी रावसाहेब दानवे यांनी खोतकर यांच्या घरी जावून गळाभेट घेतली. तसेच विविध विषयांवर चर्चा करण्यात आली. या गळाभेटीमुळे महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांची चिंता दूर झाली असून, शिवसैनिक प्रचारात उतरले आहेत.