लोकमत न्यूज नेटवर्कजालना : गावातील तंटे गावातच मिटवून ग्रामस्थांनी शांततेतून समृध्दीकडे जावे, या चांगल्या हेतूने शासनाने तंटामुक्त समित्यांची स्थापना केली. मात्र समितीचे पदाधिकारी आपले अधिकार आणि कर्तव्याबाबत अनभिज्ञ असल्याचे गावातील तंटे सोडविण्यासाठी गावकरी पुन्हा पोलीस ठाण्याचे दार ठोठावत आहेत. त्यामुळे जिल्ह्यातील तंटामुक्त ग्रामसमित्या नावालाच उरली की काय, अशी शंका येते. शासनाच्या या चांगल्या उद्देशालाच हरताळ फासल्या जात आहे.पोलिसांवरील कामाचा वाढता ताण कमी व्हावा, गावातील भांडण, तंटे सामजस्याने गावातच मिटवावे या चांगला उद्देश डोळ्यासमोर ठेवून तत्कालीन गृहमंत्री स्व. आर.आर. पाटील यांच्या पुढाकारातून राज्यात महात्मा गांधी तंटामुक्त योजना सुरु करुन गावात समित्या स्थापन करण्यात आल्या आहेत. या समित्यांचे अधिकार कोणते, तंटे कसे मिटवावेत, ग्रामस्थांनी पोलिसाकडे न जाता समितीकडे कसे येतील याबाबत समितीचे पदाधिकारी तसेच गावकरी अनभिज्ञ आहेत. समितींच्या पदाधिकाऱ्यांना आपल्या अधिकाराची जाणीव परिपूर्ण नसल्याने बहुतांश गावातील तंट्याच्या तक्रारी ठाण्यात येत आहेत. याचाच परिणाम म्हणून पोलीस विभागावरील ताणही वाढत आहे. गावातील वाद गावातच सोडविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या समित्या नावालाच उरल्या आहेत.ग्रामीण भागात गावपातळीवर सभेचे आयोजन करुन जनजागृती करणे आवश्यक असताना तसे होताना दिसत नाही. गावातील वाद पोलीस ठाण्यात आले की अनेकांचे हात ओले होतात.त्यामुळे पोलीस सुध्दा नागरिकांना तंटामुक्तीविषयी जागृत करण्याच्या मनस्थितीत दिसत नाहीत. शासनाच्या चांगल्या योजना असल्या तरी त्याची प्रभावीपणे अंमलबजावणी प्रचार - प्रचार होताना जिल्ह्यात दिसत नाही.शासनाने गावातील तंटे गावातच मिटविल्यास त्या गावाला लाखो रुपयांचे बक्षीस दिले जाते. समितीचे पदाधिकारी पुरस्कार मिळविण्यासाठी मोठी धडपड करतात, मात्र गावातील तंटे मिटविताना दिसत नाही. गावातल्या गावात अबोला नको म्हणून समितीतील पदाधिकारी याकडे दुर्लक्ष करत आहे. गावातील तंटे कमी झाल्यावर त्या गावाला तंटामुक्त गाव पुरस्कार देण्यात येतो, मात्र त्या गावातील तंटे कायमस्वरुपी मिटविण्यासाठी समित्या निष्क्रिय ठरत आहेत.
गावातील तंटे पुन्हा पोलिसांच्या दारी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 18, 2019 1:09 AM