जालना : निधीच्या मुद्यावरून काँग्रेसचे ११ आमदार नाराज असून, या नाराजीचा केव्हाही विस्फोट होऊ शकतो, असा सूचना वजा इशारा काँग्रेसचे आमदार कैलास गोरंट्याल यांनी दिला होता. हे वृत्त राज्यभर झळकताच त्याची दखल घेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी सोमवारी आ. गोरंट्याल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधला व जालन्यासह अन्य पालिकांना निधीचे वितरण केले जाईल, असे आश्वासन दिले.
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जालन्यासह राज्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांना विकास निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. आ. गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत याबाबत माहिती दिली होती. आ. गोरंट्याल यांनी घेतलेल्या भूमिकेचे वृत्त राज्यभर पसरल्यानंतर उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजित पवार यांनी मुख्यमंत्री आणि नगर विकास खात्याच्या मंत्र्यांशी चर्चा केली. तसेच पवार यांनी सोमवारी आ. गोरंट्याल यांच्याशी भ्रमणध्वनीवर संपर्क साधून त्यांना याबाबतची माहिती दिली. काँग्रेस आमदारांच्या मागणीनुसार निधीचे पत्र मंगळवारी आपल्या कार्यालयात येऊन घेऊन जावे, असे आश्वासनही पवार यांनी दिल्याचे गोरंट्याल यांनी सांगितले.
काय होती नाराजी
गेल्या तीन ते चार महिन्यांपासून जालन्यासह राज्यातील काँग्रेसच्या ताब्यात असलेल्या नगर पालिकांना विकास निधी मिळण्यास अडचणी निर्माण झाल्या होत्या. त्यातच साधारणपणे २७ मार्च २०२० रोजी २८ कोटी रूपयांचा निधी जालना नगर पालिकेला मंजूर असल्याचा अध्यादेश निघाला होता. मात्र, २९ मार्च रोजी तो अध्यादेश रद्द करून मंजूर परस्पर निधी इतरत्र वळविण्यात आल्याचा आरोप आ. कैलास गोरंट्याल यांनी दोन दिवसांपूर्वी जालना येथे आयोजित पत्रकार परिषदेत केला होता. तसेच नगर विकास खात्याकडून सहकार्य मिळत नसल्याची बाब काँग्रेसच्या नेते मंडळींसह मुख्यमंत्र्यांच्या कानावर घातल्याचे त्यांनी सांगितले. मात्र, मुख्यमंत्र्यांनी निधी देण्याचे आश्वासन दिले आहे. मात्र, मागणीनुसार निधी मंजूर न झाल्यास काँग्रेसच्या ११ आमदारांमध्ये असलेल्या नाराजीचा विस्फोट केव्हाही होऊ शकतो. आपण वेट अॅण्ड वॉचच्या भूमिकेत असल्याचे आ. गोरंट्याल म्हणाले होते. आ. गोरंट्याल यांनी काँग्रेस आमदारांमध्ये असलेली नाराजी जाहीर केल्यानंतर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी गोरंट्याल यांच्यासह इतर आमदारांची नाराजी दूर करण्यासाठी पुढाकार घेतल्याचे दिसून येत आहे.