लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात खरीप आणि रबी हंगामात मिळून जवळपास एक हजार ३९ कोटी रुपयांचे पीककर्ज वाटप झाले असून, जालना जिल्हा महाराष्ट्रात तिसऱ्या क्रमांकावर असल्याचे सांगण्यात आले. चालू आर्थिक वर्षात जिल्ह्यात पीककर्ज वाटपाचे एकूण एक हजार ४०० कोटी रूपयांचा इष्टांक निश्चित करण्यात आला होता.जिल्ह्यात यंदा दुष्काळ असल्याने मोठ्या प्रमाणावर पीककर्ज काढण्यासाठी मोठी गर्दी करण्यात आली होती. पीककर्ज वाटपासाठी यावेळी जिल्हाधिकारी तसेच सहकार निबंधकांनी पालकमंत्री बबनराव लोणीकर यांच्या पाठपुराव्यामुळे तालुका निहाय कर्ज वाटप मेळावे घेतले होते. त्यात तहसीलदार, तालुका उपनिबंधक सर्व बँक अधिकाऱ्यांचा समावेश होता. त्यामुळे शेतकऱ्यांनी त्या मेळाव्यात येऊन आवश्यक ते कागदपत्र सादर करून पीककर्ज मिळावे म्हणून प्रयत्न करण्यात आले होते.या प्रशासनाच्या उपक्रमामुळे जास्तीत जास्त शेतक-यांना पीककर्ज मिळाले आहे. जिल्ह्यात एकूण २१ राष्ट्रीयकृत, ३ सहकारी, ग्रामीण बँक तसेच मध्यवर्ती सहकारी बँकांच्या माध्यमातून हे पीककर्ज वाटप करण्यात आल्याची माहिती देण्यात आली. कर्ज वाटपाची ही टक्केवारी जवळपास ७२ टक्के होते. त्यात खरीप हंगामात ८९१ कोटी १६ लाख रुपये हे जवळपास एक लाख ३९ हजार शेतक-यांना देण्यात आले. तर रबी हंगामात १८ हजार ८१७ शेतक-यांना १४७ कोटी ८६ लाख रुपयांचे कर्ज देण्यात आले.हे एवढ्या मोठ्या प्रमाणावर कर्ज वाटप होण्याची ही जिल्ह्याची पहिलीच वेळ असून, ही कर्ज वाटपाची योजना जवळपास एक हजार १०० कोटी रुपयांवर जाईल असे बँकेतील अधिका-यांनी सांगितले. पीककर्जाच्या माध्यमातून अनेक शेतक-यांनी पेरणीसाठी बियाणे खरेदीसह खत खरेदीसाठी घेतले आहे. तर काहींनी शेतात ठिबक सिंचनाचा संच बसविण्यासाठी कर्ज घेतले आहे.शेतक-यांना दिलासा : कर्जमाफीमुळे फायदापीककर्ज मोठ्या प्रमाणावर वाटप झाल्याने आणि नंतर लगेचच राज्य सरकारने जुलै महिन्यात कर्जमाफी जाहीर केल्याने त्याचा मोठा लाभ शेतक-यांना झाला आहे. छत्रपती शिवाजी महाराज कृषी सन्मान योजनेतून जवळपास दीड लाख रुपयांपर्यंतची कर्जमाफी झाल्याने त्याचा मोठा लाभ जिल्ह्यातील शेतक-यांना झाला असून, जवळपास ५०० कोटी रुपयांची कर्जमाफी जिल्ह्यातील शेतक-यांना मिळाली असल्याचे सांगण्यात आले. सर्व बँकांनी अधिकाधिक कर्ज वाटप करावे म्हणून जिल्हाधिका-यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत सूचना केल्यानेच हे शक्य झाले असल्याचे जिल्हा अग्रणी बँकेचे व्यवस्थापक निशांत इलमकर आणि सहायक व्यवस्थापक तायडे यांनी सांगितले.
जालना जिल्ह्यात एक हजार कोटींचे पीककर्ज वाटप
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 05, 2019 1:27 AM