लोकमत न्यूज नेटवर्कजालना : प्रत्यक्ष मतदानाला अद्याप महिनाभराचा कालावधी शिल्लक असला तरी, जिल्हा प्रशासनाने त्याची तयारी आतापासून सुरू केली आहे. जालना लोकसभा मतदार संघात येणाऱ्या सहा विधानसभा मतदार संघात मतदान यंत्र पोहोचविण्याच्या कामाला मंगळवारपासून प्रारंभ झाला आहे. जिल्हाधिकारी कार्यालय तसेच समाज कल्याण विभाग अशा दोन्ही ठिकाणी ठेवलेली यंत्रे आता सुरक्षितरीत्या संबंधित निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे सुपूर्द करण्यात येणार आहेत.जालना लोकसभा मतदार संघात जालना, भोकरदन, बदनापूर तसेच फुलंब्री, पैठण आणि सिल्लोड हे विधानसभा मतदारसंघ येतात. त्यामुळे संबंधित निवडणूक अधिकाऱ्यांकडे तिन्ही मतदार यंत्रे पाठविली जात असल्याची माहिती निवडणूक उपजिल्हाधिकारी राजीव नंदकर यांनी दिली. दरम्यान, यात जालना लोकसभा मतदार संघात एकूण २००२ सीयू, तेवढ्याच बीयू मशीन आणि जवळपास २१७७ व्हीव्हीपॅट मशीन मतदान केंद्रनिहाय वितरीत करण्यात येत आहेत.एकूणच व्हीपॅट मशीनचा उपयोग यापूर्वी गोंदिया येथील पोटनिवडणुकीत केला होता. मात्र, तेथे या मशीनमध्ये अनेक त्रुटी निर्माण झाल्या होत्या. या मशीन चांगल्या पध्दतीने काम करण्यासाठी त्यांना तापमान हे कमी लागते. साधारणपणे ३० अंशांवर तापमान असावे, असे निकष आहेत. परंतु आपल्या निवडणुका ऐन एप्रिलच्या शेवटच्या आठवड्यात होणार असून, त्यावेळी या भागातील तापमान हे किमान ३५ अंशाच्या पुढेच असते. एकूणच यामुळे या मशीनच्या वापरावर प्रश्नचिन्ह निर्माण होऊ शकते, असे सूत्रांनी सांगितले.यंदा महाराष्ट्रात गोंदियाची निवडणूक वगळता प्रथमच व्हीव्हीपॅटचे मशीन उपयोगात आणले जाणार आहे. या व्हीव्हीपॅट मशीनवर संबंधित मतदान करणा-याला त्याने कोणाला मतदान केले आहे, हे दिसणार आहे.तसेच एका मशीनमधून एक हजार ५०० चिठ्ठ््या निघणार असून, यासाठी थर्मल पेपरचा उपयोग करण्यात आला आहे. आजघडीला या मशीनवरील चिठ्ठीचे मतदान हे सहा विधानसभेतील कुठल्याही एका मतदान केंद्रावरील मोजणी करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले.
मतदान यंत्र विधानसभानिहाय वाटपाची जिल्हा प्रशासनाची लगबग
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2019 12:11 AM