लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जालना जिल्ह्यात पाणी टंचाईने रौद्र रूप धारण केले आहे. एप्रिलच्या मध्यावर ४०३ पेक्षा अधिक टँकरची संख्या पोहोचली आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर टँकर लागणार असल्याने त्या टँकरचे पाणी नागरिकांपर्यंत पोहोचते की, नाही हे पाहण्यासाठी आता जीपीएस प्रणालीसह तहसीलदार, मंडळ अधिकारी आणि तलाठ्यांना आठवड्यातून तीन वेळेस टँकरच्या फेऱ्यांची तपासणी करण्याचे निर्देश निवासी उपजिल्हाधिकारी सोहम वायाळ यांनी दिले आहेत.जालना जिल्ह्यात दुष्काळने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्यात यंदा सरासरीपेक्षा कमी पाऊस झाल्याने विहिरी आणि तळ्यांनी तळ गाठला आहे. त्यामुळे पाणीप्रश्न गंभीर बनला आहे.यावर उपाय म्हणून आता टँकर हाच पर्याय असून, गावातील ज्या विहिरींना पाणी आहे, त्या विहिरी अधिग्रहित करण्यात येत आहेत. आता पर्यंत जवळपास साडेचारशे पेक्षा अधिक विहिरींचे अधिग्रहण करण्यात आल्याचे वायाळ म्हणाले. एकूणच दुष्काळाबाबत प्रशासन सतर्क आहे, परंतु नागरिकांनी देखील त्याची काळजी घेण्याची गरज असून आहे त्या पाण्याचा काटकसरीने वापर करण्याची गरजही व्यक्त केली जात आहे. या संदर्भात टँकरचा पुरवठा करणाºया एजन्सीला संपर्क केला असता ते म्हणाले की, आम्ही शासनाचे सर्व निकष पाळूनच टॅकरव्दारे पाणीपुरवठा करत आहोत. परंतु कुठे विजेचा प्रश्न तर कधी टँकरमध्ये तांत्रिक बिघाड झाल्यावर ठरवून दिलेल्या फे-या करतांना अडचणी येत असल्याचे त्यांनी सांगितले.रोहयोच्या कामांवर १२ हजार ८०० मजूरजालना जिल्ह्यातील आठही तालुक्यात रोजगार हमी योजनेच्या कामांचे मोठे नियोजन केले आहे. मागेल त्या गावात तातडीने कामे देण्यासाठीचे नियोजन तयार आहे. रोजगार हमीच्या कामांवर १२ हजार ८०० पेक्षा मजूर असणे म्हणजे ग्रामीण भागातही अनेकांना रोजगार हमीची कामांची गरज असल्याचे दिसून येते. काही ठिकाणी कामे नसल्या बाबतची तक्रार आहे, परंतु त्याची लगेचच दखल घेतली जाते.याचे उदाहरणच द्यायचे झाल्यास मंठा तालुक्यातील केंधळी येथील देता येणार असून, तेथे दोन दिवसांत मागणीनुसार कामे सुरू केली आहेत. त्या कामांवर २०० पेक्षा अधिक मजूर कामावर आहेत.जालना जिल्ह्यात रोहयोची कामे जास्तीत जास्त वाढविण्यासाठी गुरुवारी कृषी आणि महसूल विभागातील प्रमुख अधिकाऱ्यांची बैठक बोलावण्यात आली आहे.चारा छावण्याही सुरू करणार, पण...जालना जिल्ह्यात चारा आणि पाण्याचा प्रश्न बिकट आहे. असे असताना प्रशासन चारा छावण्या सुरू करत नाही, असा आरोप केला जात आहे. परंतु जिल्हाधिकरी रवींद्र बिनवडे यांनी या आलेल्या चारा छावण्यांचा अभ्यास केला आहे. त्यासाठी एकूण १६ प्रस्ताव जिल्हा प्रशासनाकडे प्राप्त झाले आहेत. परंतु त्यात काही कागदपत्रांच्या त्रुटी आहेत. त्या पूर्ण केल्यास लगेचच चारा छावण्या सुरू होतील. परंतु आता चारा छावण्यांवर सीसीटीव्हीची नजर राहणार असून, त्याचे दररोजचे चित्रीकरण हे प्राप्त केल्या जाणार आहे. त्यातच ज्या संस्थांनी चारा छावणी सुरू करण्यासाठी प्रस्ताव पाठवले आहेत, त्यांची आर्थिक स्थिती देखील सक्षम असली पाहिजे, असेही शासनाचे म्हणणे आहे. एखाद्या वेळेस शासनाकडून अनुदान मिळण्यास उशीर झाल्यास त्या चारा छावण्यातील जनावरांचा सांभाळ सक्षमपणे करता आला पाहिजे अशी अपेक्षा आहे.- सोहम वायाळ, निवासी उपजिल्हाधिकारी, जालना
जालना जिल्ह्यातील टँकरच्या फेऱ्या चौकशीच्या रडारवर
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 11, 2019 12:08 AM