हवेतून ऑक्सिजन शोषून त्यावर प्रकिया करुन शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए (Pressure Swing Adsorption) या ऑक्सिजन निर्मिती प्लँटचा शुभारंभ, तर प्रयोगशाळेत नव्याने उभारण्यात आलेल्या स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक (Fully Automated Chemistry Analyser) व कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्राचा शुभारंभ आरोग्यमंत्री तथा जिल्ह्याचे पालकमंत्री राजेश टोपे यांच्या हस्ते शुक्रवारी करण्यात आला.
यावेळी आमदार कैलास गोरंट्याल, नगराध्यक्षा संगीता गोरंट्याल, जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे, प्र. पोलीस अधीक्षक विक्रांत देशमुख, उप विभागीय अधिकारी संदीपान सानप, उपजिल्हाधिकारी रवींद्र परळीकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. अर्चना भोसले, अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. प्रताप घोडके, डॉ. पद्मजा सराफ आदींची प्रमुख उपस्थिती होती.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जिल्हा वार्षिक येाजनेच्या माध्यमातुन ८० लक्ष रुपये खर्च करून हवेतून ऑक्सिजन शोषून त्यावर प्रकिया करून शुद्ध ऑक्सिजनचा पुरवठा करणाऱ्या पीएसए ऑक्सिजन प्लँटची उभारणी जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या परिसरात करण्यात आली आहे. हा प्लँट अत्यंत आधुनिक असून, ६०० लिटर प्रति मिनिट ऑक्सिजन निर्मिती यातून होण्याबरोबरच दरदिवशी १२५ जम्बो सिलिंडर भरण्याची क्षमता या प्लँटमध्ये आहे. जालना जिल्ह्यात अनेक स्टील उद्योगांनी ऑक्सिजनची निर्मिती करणाऱ्या प्लँटची उभारणी केली असून, जालना जिल्हा हा ऑक्सिजन निर्मितीमध्ये स्वयंपूर्ण झाला असल्याचे सांगत जालना जिल्ह्याच्या आठही तालुक्यामध्ये डीआरडीओ, एसडीआरएफ, सीएसआर तसेच जिल्हा नियोजन मंडळातून आधुनिक असे पीएसए प्लँट उभारण्यात येणार असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
५० रुग्णांच्या ३६० प्रकारच्या विविध चाचण्या करणाऱ्या
स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक प्रणालीचा शुभारंभ
जिल्हा सामान्य रुग्णालयातील प्रयोगशाळेमध्ये जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून स्वयंचलित रसायनशास्त्र विश्लेषक प्रणाली उभारण्यात आली आहे. याप्रणालीद्वारे रक्तदाब, मधुमेह, लिव्हर फंक्शन, किडनी फंक्शन टेस्ट, शरीरामधील इलेक्ट्रॉलाइट सोडियम, पोटॅशियम, क्लोराइड, कॅल्शियम यासह रुग्णांच्या ३६० प्रकारच्या विविध चाचण्या केवळ एका तासामध्ये या प्रणालीद्वारे उपलब्ध होणार असल्याने सर्वसामान्य रुग्णांना याचा मोठा फायदा होणार असल्याचेही पालकमंत्री राजेश टोपे यांनी यावेळी सांगितले.
-------------------
महिला रुग्णालयात कर्करोग व उपचार केंद्र
कर्करोगाच्या रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत असून, या आजाराच्या प्रतिबंधासाठी तसेच या आजारावरील उपचारासाठी टाटा रुग्णालयाच्या सहकार्याने जिल्हा स्त्री रुग्णालयात कर्करोग बाह्यरुग्ण विभाग व उपचार केंद्र सुरू करण्यात आला आहे. औरंगाबाद येथे कर्करोगावर उपचार करणारे हॉस्पिटल असून, त्याचेच स्पोक मॉडेल म्हणून याठिकाणी बाह्यरुग्ण कक्षाची उभारणी करण्यात आली आहे. कर्करोगाच्या तपासणीसाठी आवश्यक असलेली सर्व यंत्रसामग्री उपलब्ध करून देण्यात आली असून, केमोथेरेपी व स्क्रिनिंगची सुविधाही याठिकाणी रुग्णांना उपलब्ध होणार आहे. राज्य शासन व सीएसआरच्या माध्यमातून ३५ कोटी रुपये खर्च करून कोबाल्ट युनिट (रेडीएशन सुविधा) ही लवकरच या ठिकाणी उभारण्यात येणार असल्याचे सांगत रुग्णांना कर्करोगाच्या उपचारासाठी इतरत्र जाण्याची गरज भासणार नसून जालन्यात कर्करोगारावरील उपचाराची सोय मोफत उपलब्ध झाली असल्याचेही पालकमंत्री टोपे यांनी यावेळी सांगितले.
6 Attachments