जालना : एखाद्या बॅँकेतकॅश केबिनमध्ये रोख रक्कम देण्या-घेण्याच्या कामात गुणाकार, बेरीज, वजाबाकी आणि भागाकार करून वेगात हिशोब करण्यासाठी तिथला कॅशियर जे कॅलक्युलेटर वापरतो, ते कॅलक्युलेटर बाहेर उभ्या असलेल्या एखाद्याने हॅक करून त्यात त्याला पाहिजे तसे फेरबदल करणे जसे अशक्य आहे, अगदी तसेच इलेक्ट्रॉनिक मतदान यंत्रात कुणालाही बाहेरून अथवा आतून काही फेरबदल करणे अगदीच अशक्य आहे, अशी भूमिका भारत निवडणूक आयोगाचे माहिती व तंत्रज्ञान विभागाचे संचालक तथा संगणक शास्त्रज्ञ डॉ. विजयेंंद्र शुक्ला यांनी मांडली.येथील जेईएस महाविद्यालयाच्या वतीने आयोजित माजी विद्यार्थी संवाद तसेच विशेष सत्कार समारंभात ते मंगळवारी बोलत होते.व्यासपीठावर मराठवाडा विभागाचे तंत्र शिक्षण खात्याचे सहसंचालक महेश शिवणकर, जेईएस शिक्षण संस्थेचे अध्यक्ष पुरुषोत्तम बगडिया, सचिव श्रीनिवास भक्कड, प्राचार्य डॉ. जे. डी. काबरा उपस्थित होते.किल्लेधारूर ते भारतीय निवडणूक आयोग व्हाया जेईएस महाविद्यालय या सगळ्या आपल्या आयुष्यातील प्रवासाचा उलगडा शुक्ला यांनी यावेळी केला.ते म्हणाले की, जेईएस महाविद्यालयात एमएस्सी फिजिक्स इलेक्ट्रॉनिक्स या दोन वर्षाच्या कालावधीत आपण इलेक्ट्रॉनिक्स थेअरी सोबतच प्रॅक्टिकल ज्ञान जे काही शिकलो, तोच आपल्या प्रगतीचा पाया आहे. जेईएसमधील भौतिकशास्त्र, इलेक्ट्रॉनिक्स विभाग हा संपूर्ण महाराष्ट्रात त्या काळापासून सर्वाधिक प्रगत आहे. तत्कालीन विभाग प्रमुख प्रा. के. आर. पाटील, प्रा. सुरेश लाहोटी, प्रा. भंडारी यांनी आपल्याला शिकवलेल्या इलेक्ट्रॉनिक्स विषयाच्या पायाभूत ज्ञानाच्या आणि व्यक्तिगत पातळीवर केलेल्या मदतीने आणि मार्गदर्शनातूनच आपले व्यक्तिमत्त्व घडल्याचे डॉ शुक्ला यांनी सांगितले.इलेक्ट्रॉनिक्स आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात काम करणा-यांना खूपच उज्ज्वल भवितव्य आहे. कॉमर्स शाखेच्या विद्यार्थ्यांनी माहिती तंत्रज्ञान क्षेत्रात आले पाहिजे, त्यांना खूप मोठा वाव मिळेल. माहिती तंत्रज्ञानाच्या क्षेत्रात व्यवसाय उभा करण्यासाठी केंद्र सरकारच्या वतीने मोठी रक्कम अनुदान स्वरूपात कंप्युटर आणि अन्य साहित्य खरेदी करण्यासाठी दिली जाते, असे शुक्ला म्हणाले.इयत्ता ८ ते इयत्ता १० या वर्गातील ५० ते ६० टक्के जागा मिळवणाºया विद्यार्थ्यांना करिअरच्या दिशेची पायाभरणी आणि संपूर्ण मार्गदर्शन करणार असल्याचे शिक्षण सहसंचालक महेश शिवणकर यांनी सांगितले.माजी विद्यार्थ्यांच्या माध्यमातून शैक्षणिकदृष्ट्या प्रगती, रोजगाराच्या आणि स्वयंरोजगाराच्या वाटा विद्यार्थ्यांना माहिती करून देण्यासाठी त्यांच्या अनुभवाचा फायदा विद्यार्थ्यांना करून देण्यासाठी माजी विद्यार्थी संवाद हा विशेष कार्यक्रम सातत्याने चालवत आहोत. त्यामुळे आमच्या वर्तमान विद्यार्थ्यांना खूप चांगला फायदा होतो आहे, असे पुरुषोत्तम बगडिया यांनी सांगितले. प्रास्ताविक प्राचार्य डॉ. जे. डी. काबरा यांनी तर सूत्रसंचालन डॉ. सुशांत देशमुख यांनी केले. प्रा. टी. आर. जगताप यांनी आभार मानले.
मतदान यंत्रात छेडछाड अशक्य..!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 24, 2018 12:46 AM