लोकमत न्यूज नेटवर्कआष्टी : गुडीपाडव्याच्या पूर्वसंध्येला चोरट्यांनी शिक्षकाचे घर फोडून कपाटातील सोने-चांदीच्या दागिन्यांसह रोख रक्कम, असा पाच लाख ७० हजार रुपयांचा ऐवज लंपास केला. परतूर तालुक्यातील दैठणा येथे ही घटना घडली.दैठणा येथील अमृत देविदास सवने हे परतूर येथील लाल बहादूर शास्त्री विद्यालयातील शिक्षक आहेत. कुटुंबियांसह ते दैठणा येथे राहतात. सवने कुटुंबीय शनिवारी झोपी गल्यानंतर मध्यरात्री दीड वाजेच्या सुमारास चोरट्यांनी त्यांच्या बाजूच्या खोलीचे कुलूप तोडून आत प्रवेश केला.कपाटातील १५ तोळे सोने, अर्धा किलो चांदीच्या दागिन्यांसह एक लाख रुपये रोख, असा एकूण पाच लाख सत्तर हजार रुपयाचा ऐवज चोरून नेला. सवने झोपलेल्या खोलीला बाहेरून कडी लावून दरवाजा बंद केला. घरात कुणीतरी प्रवेश केल्याचे लक्षात आल्यानंतर बंधू सुभाष सवने यांनी अमृत यांना आवाज उठविण्याचा प्रयत्न केला. मात्र त्यांना आवाज आला नाही. त्यानंतर त्यांनी भावाच्या फोनवर संपर्क केला. नागरिक जमा होत असल्याचे लक्षात आल्यानंतर चोरट्यांनी पळ काढला. माहिती मिळताच आष्टी ठाण्याचे सहाय्यक पोलिस निरीक्षक विनोद इजापवार हे कर्मचऱ्यांसह घटनास्थळी पोहचले. हाताचे ठसे तपासणीसाठी ठसे तज्ज्ञ, श्वान पथकाला पाचारण करण्यात आले. या प्रकरणी अमृत सवने यांच्या फियार्दीवरून आष्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
दैठणा येथे शिक्षकाचे घर फोडले
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 19, 2018 12:52 AM