लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्ह्यात २८ जानेवारी व ११ मार्च रोजी पल्स पोलिओ लसीकरण मोहीम राबविण्यात येणार असून, या मोहिमेमध्ये शून्य ते पाच वयोगटातील एकही बालक लसीपासून वंचित राहणार नाही याची दक्षता घ्यावी, असे निर्देश जिल्हाधिकारी शिवाजी जोंधळे यांनी दिले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयाच्या सभागृहात पल्स पोलिओ समन्वय समितीच्या बैठकीत अधिका-यांना मार्गदर्शन करताना जिल्हाधिकारी बोलत होते.यावेळी जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. एम.के. राठोड, जिल्हा आरोग्य अधिकारी अमोल गिते, डॉ. प्रकाश नांदापुरकर, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी एस.डी. लोंढे आदींची प्रमुख उपस्थिती होती.जिल्हाधिकारी म्हणाले की, लसीकरण मोहीम जिल्ह्यात यशस्वीरित्या राबविण्यासाठी मोहिमेचा नियोजनबद्ध व सुक्ष्म आराखडा तयार करण्यात यावा. जिल्ह्यातील ० ते ५ वयोगटातील बालकांची माहिती घेऊन त्याप्रमाणात डोस मागणी करण्याच्या सूचना दिल्या. केवळ बुथवरच नव्हे, तर बसस्थानक, रेल्वेस्थानक, झोपडपट्ट्या, वीटभट्ट्या, बांधकामाची ठिकाणे अशा ठिकाणीही बालकांचा शोध घेऊन त्यांना लस पाजण्यात यावी. या मोहिमेत एकही बालक लसीकरणापासून वंचित राहणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या.पल्स पोलिओ लसीकरण मोहिमेबाबत जनजागृतीसाठी गावोगावी बॅनर तसेच शालेय विद्यार्थ्यांच्या रॅलीचे आयोजन करण्याबरोबरच सोशल मीडियाच्या माध्यमातून जनजागृती करण्यात यावी. अशा सूचनाही त्यांनी दिल्या. बैठकीस तालुका आरोग्य अधिकारी वाघमारे, सोनी, एम. एस. तलवडकर, महिला रुग्णालयाचे पाटील, अभियंता एम.एम. लोधी, घोडके यांच्यासह संबंधित विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
बालके वंचित राहू देऊ नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 19, 2018 12:33 AM