लोकमत न्यूज नेटवर्कजालना : जिल्हा परिषदेच्या कुठल्याच विभागातील अधिकारी वेळेवर कामे करीत नाहीत. पाणीटंचाई असो की सिंचन सर्वच विभागात मनमानी सुरू आहे. सदस्यांनी मागितलेली माहिती सभागृहात देण्याऐवजी वेळ मारून नेली जाते. याच मुद्यावर स्थायी समितीच्या सभेत विरोधकांनी सोमवारी अध्यक्ष व उपाध्यक्षांना धारेवर धरले. अधिका-यांना पाठीशी न घालता चुकीचे काम करणा-यांवर कारवाई करण्याची मागणी विरोधकांनी केली.दुपारी साडेतीन वाजता कै. यशवंतराव चव्हाण सभागृहात जि.प. अध्यक्ष अनिरुद्ध खोतकर यांच्या अध्यक्षतेखाली सभेस सुुरुवात झाली. उपाध्यक्ष सतीश टोपे, सभापती रघुनाथ तौर, दत्तात्रय बनसोडे, जिजाबाई कळंबे, सुमनबाई घुगे, राठोड, मुख्य कार्यकारी अधिकारी नीमा अरोरा, उपमुख्य कार्यकारी अधिकारी संतोष धोत्रे, लेखा व वित्ताधिकारी उत्तम चव्हाण आदींची उपस्थिती होती.सभेच्या सुरुवातीलाच सदस्य अवधूत खडके यांनी मागील सभेतील मुद्यांचा कार्यवृत्तांत समावेश न केल्याचा मुद्दा उपस्थित केला. वारंवार निदर्शनास आणूनही असेच प्रकार घडत असल्याने सभेचे व्हिडिओ चित्रकरण व्हावे, अशी मागणी त्यांनी केली. मात्र, अध्यक्षांनी यास नकार दिला.शहीद भगतसिंग, राजगुरु व सुखदेव यांच्या पुण्यतिथीच्या दिवशी जयंती कार्यक्रम साजरा करण्याचे पत्रक काढणारे प्राथमिक शिक्षणाकिधारी पांडुरंग कवाणे यांच्यावर कारवाई करण्याची मागणी खडके यांनी केली. ही अनवधानाने झालेली चूक लगेच दुरुस्त करण्यात आली. त्याबद्दल सभागृहात माफी मागतो, असे अध्यक्ष खोतकर सभागृहात म्हणाले. तर या पुढे अशी चूक झाल्यास संबंधित अधिका-यास कारणे दाखवा नोटीस देण्यात येईल, असे मुख्याधिकारी आरोरा यांनी सांगितले. सिंचन विभागाने पाझर तलावासाठी संपादित केलेल्या जमिनीवर अद्यापही शासनाचे नाव लागलेले नाही. प्रत्येक सभेत हा मुद्दा उपस्थित करूनही काहीच कार्यवाही झाली नाही. यामध्ये वैयक्तिक कुठलाही स्थार्थ नाही. मात्र, अधिकारी काहीच काम करत नसतील तर त्यांना घरी बसवावे, अशी मागणी सदस्य शालिग्राम म्हस्के यांनी केले. उपाध्यक्ष टोपे यांनी याच मुद्यावर सिंचन विभागाने अभियंता अशपाक यांना चांगलेच धारेवर धरले. मार्चअखेर सुरू असताना ग्रामीण पाणीपुरवठा विभागाचे काहीच नियोजन नाही. परस्पर ७२ लाखांच्या कामांना प्रशासकीय मान्यता देण्यात आली. प्रस्ताव मंजूर करताना विश्वासात कुणालाच विश्वास घेतले नाही या मुद्यावरही म्हस्के यांनी आक्षेप घेतला. नुकत्याच शिक्षण विभागाने क्रीडा स्पर्धा घेतल्या.या स्पर्धा उन्हाळ्यात व परीक्षा काळात न घेता नोव्हेंबर, डिसेंबर महिन्यात घेतल्या जाव्यात, अशी मागणी बप्पासाहेब गोल्डे यांनी सभागृहात केली. तर जिल्हा परिषद शाळेसाठी मंठा चौफुली परिसरात अनेक वर्षांपासून संपादित जागेवर काहीच झालेली नाही. जिल्हा परिषदेच्या मालकीची ही जागा बेवारस पडली आहे. याबाबत उचित निर्णय घेतला जावा, असे जयमंगल जाधव यांनी सभागृहात सांगितले.
अधिकाऱ्यांना पाठीशी घालू नका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 27, 2018 1:03 AM