जालना : चविष्ट असलेले चायनीज खाण्याकडे अनेकांचा कल वाढला आहे. परंतु, चायनीज खाद्याला चव येण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या अजिनोमोटोमुळे अनेकांना पोटाचे विविध आजार जडू लागले आहेत. बालकांसह युवा वर्गाचे या रुग्णांमध्ये अधिक प्रमाण दिसून येत आहे.
चिनी उत्पादन असलेले अजिनोमोटो चायनीज खाद्यपदार्थाला चव यावी म्हणून वापरले जाते. यापूर्वी बाहेरील खाद्यामध्ये वापरले जाणारे अजिनोमोटो आता अनेकांच्या स्वयंपाक घरातही आले आहे. नूडल्स, सूप, आदी विविध खाद्यपदार्थांमध्ये याचा वापर केला जात आहे. या खाद्यपदार्थांना अधिक चांगली चव यावी, यासाठी याचा वापर केला जात आहे. परंतु, अधिक प्रमाणात वापर केला जात असल्याने मानवी शरीरावर याचा विपरीत परिणाम होत आहे. चवदार खाणे खाण्याची सवय लागल्यानंतर याचा अतिरिक्त वापर वाढत आहे. विशेषत: गर्भवती महिलांसाठी हा पदार्थ अधिक घातक ठरू शकतो. माइग्रेनचा आजार व छातीचे आजार असलेल्यांसाठीही अजिनोमोटे घातक ठरू शकतो.
काय आहे अजिनोमोटो?
अजिनोमोटो हा पदार्थ चिनी खाद्यपदार्थांमध्ये अधिक प्रमाणात वापरला जातो. याचा वापर केल्याने खाद्यपदार्थांना अधिकची चव येते. चविष्ट खाणे खाण्याची सवय लागल्यानंतर सातत्याने हा पदार्थ सेवन करण्यात येतो. त्यामुळे पोटविकारासह कॅन्सरसारख्या घातक आजारालाही निमंत्रण मिळण्याची शक्यता नाकारता येत नाही.
......म्हणून चायनीज खाणे टाळा
बाहेरील खाणे विशेषत: चायनीजचे पदार्थ प्रमाणापेक्षा अधिक खाणे शरीरासाठी घातकच आहे. अजिनोमोटो द्रवामुळे पोटविकार होतात. शिवाय वजन वाढण्यासही कारणीभूत ठरत आहे. त्यामुळे चायनीज पदार्थ खाणे टाळणे अधिकच चांगले आहे.
केवळ चायनीज नव्हे तर बाहेरील, उघड्यावरील अन्नपदार्थ खाणे हे मानवी शरीरासाठी चांगले नाही. त्यामुळे शक्यतो बाहेरील, उघड्यावरील अन्नपदार्थ, चायनीज पदार्थ खाणे टाळावे. युवकांनी अधिक प्रमाणात घरात तयार केलेले ताजे अन्न सेवन करणे गरजेचे आहे.
- डॉ. अर्चना भोसले, शल्यचिकित्सक