जालना : विविध क्षेत्रांत वाढलेली स्पर्धा शिक्षण क्षेत्रातही नवीन नाही. त्यात उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नसल्याने बेरोजगारांची संख्या वाढली आहे. परिणामी जिल्ह्यातील युुवक आता रोजगाराभिमुख शिक्षणाकडे वळू लागले आहेत.
जिल्ह्यात पॉलिटेक्निकचे पाच महाविद्यालये असून, त्यात १३२० जागा मंजूर आहेत. या १३२० जागांसाठी जवळपास १४५० मुलांनी अर्ज दाखल केले होते. प्रवेश प्रक्रियेची पहिली फेरी पूर्ण झाली आहे. जवळपास ८०० वर मुलांनी कागदपत्रे संबंधित महाविद्यालयांमध्ये जमा केली आहेत. रोजगाराभिमुख शिक्षणासाठी शासकीय महाविद्यालयासह खासगी महाविद्यालयात प्रवेश मिळावा, यासाठी जिल्ह्यातील विद्यार्थी प्रयत्न करताना दिसत आहेत.
संगणक इलेक्ट्रिककडे विद्यार्थ्यांचा ओढा
आजचे युग हे संगणकाचे युग आहे. त्यामुळे अनेक मुलांनी संगणकासह इलेक्ट्रिक अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यास प्राधान्य दिले आहे. हा अभ्यासक्रम केल्यानंतर स्वत:चा व्यवसायही सुरू करता येतो.
म्हणून पॉलिटेक्निकला पसंती
अनेक शासकीय विभागातील नाेकर भरती वेळेवर होत नाही. जेथे भरती होते तेथेही कंत्राटी भरती होते. त्यामुळे ती नाेकरी कायम राहील याची आशा नसते. त्यात उच्च शिक्षण घेतल्यानंतरही अनेक मुलं बेरोजगार आहेत. त्यामुळेच आज अनेक मुलं रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेत आहेत.
- अनिकेत राजपूत, विद्यार्थी
शिक्षण क्षेत्रात स्पर्धा वाढली असून, अनेकांना उच्च शिक्षण घेऊनही नोकरी मिळत नाही; परंतु पॉलिटेक्निकसह इतर रोजगाराभिमुख शिक्षण घेतले तर भविष्यात स्वत:चा व्यवसाय करता येतो. त्यामुळे आज अनेक मुलं पॉलिटेक्निकसह इतर रोजगाराभिमुख अभ्यासक्रमासाठी प्रवेश घेऊ लागले आहेत.
- राजरत्न सरवदे, विद्यार्थी
प्राचार्य म्हणतात...
गत काही वर्षांपासून पॉलिटेक्निकमधील विविध विभागात प्रवेश घेणाऱ्या मुलांची संख्या वाढली आहे. सध्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा पूर्ण झाला आहे. लवकरच दुसरा टप्पाही पूर्ण केला जाणार आहे.
- प्रशांत पट्टलवार, प्राचार्य
कोरोनामुळे नोकऱ्या गेलेल्या युवकांना इतर काम करताना अडचणी येत आहेत. त्यात रोजगाराभिमुख अभ्यासक्रमातून शिक्षण घेतलेली मुलं स्वत:चा व्यवसाय करीत आहेत. त्यामुळे पॉलिटेक्निककडे मुलांचा ओढा वाढला आहे.
- ए. एम. जिंतूरकर, प्राचार्य