परतूर : निवडणूक कोणतीही असो, अधिकारी, कर्मचाऱ्यांनी निर्भयपणे आपले कर्तव्य पार पाडावे, असे आवाहन निवडणूक निर्णय अधिकारी तथा तहसीलदार रूपा चित्रक यांनी केले.
तालुक्यातील ग्रामपंचायत निवडणुकीसाठी नियुक्त पथके गुरुवारी येथील जवाहर नवोदय विद्यालयातून रवाना झाली. यावेळी चित्रक बोलत होत्या. ग्रामपंचायत निवडणुका या विधानसभा व लोकसभेपेक्षा अधिक संवेदनशील आहेत. यात एखादी छोटी चूक मोठी होऊ शकते. त्यामुळे कोणाच्याही दबावाखाली न येता, निर्भयपणे व निष्पक्षपातीपणे निवडणुकीत कामे करावीत, असे आवाहनही त्यांनी केले. यावेळी नायब तहसीलदार धनश्री भालचीम, विजय दावणगावकर, व्ही.के. दंडेवाड, विद्यासागर ससाणे, मोहम्मद सुफीयान यांच्यासह अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
७१२ अधिकारी, कर्मचारी
तालुक्यातील ३७ ग्रामपंचायतींसाठी मतदनप्रक्रिया होत आहे. त्यासाठी ७१२ अधिकारी, कर्मचारी नियुक्त करण्यात आले आहेत. मतदान केंद्रांची संख्या १२२ असून, १० झोनल अधिकारी आहेत. बंदोबस्तासाठी १२ पोलीस अधिकाऱ्यांसह १४५ पोलीस होमगार्ड्स तैनात करण्यात आले आहेत. वाटूर व सातोना ही दोन गाव संवेदनशील असल्याचे सांगण्यात आले.
स्ट्राँगरूमची डॉग स्कॉडकडून तपासणी
परतूर तालुक्यातील ३८ ग्रामपंचायतींच्या निवडणुकीसाठी मतदान यंत्र ठेवण्याच्या स्ट्राँगरूमची डॉग स्कॉडकडून तपासणी करण्यात आली. या रूममध्ये प्रभागनिहाय १२२चे सीव्ही व बीयू ठेवण्यात येणार आहेत. १८ सीयू व बीयू मिळून १४० संख्या आहे. यावेळी नायब तहसीलदार विजय दावणगावकर, हवालदार एम.बी. सय्यद आदींची उपस्थिती होती.