लोकमत न्यूज नेटवर्कजालना : शहर परिसरात मोकाट कुत्र्यांनी धुमाकूळ घातला असून, मागील २१ दिवसांच्या कालावधीत दहा-वीस नव्हे तब्बल २६९ जणांचे लचके मोकाट कुत्र्यांनी तोडले आहेत. मोकाट कुत्र्यांच्या बंदोबस्ताची पालिकेच्या सभागृहात चर्चा होत असली तरी प्रत्यक्षात कारवाई शून्य आहे. परिणामी कुत्र्यांच्या दहशतीचा सामना शहरवासीयांना करावा लागत आहे.जालना शहरातील मुख्य बाजारपेठ असो किंवा गल्ली-बोळातील रस्ते असोत मोकाट कुत्र्यांचा हैदोस दिसून येतो. मोकाट कुत्र्यांसोबतच मोकाट जनावरांचा प्रश्नही शहरवासियांना सतावत आहे. मोकाट जनावरांविरूध्द वाहतूक शाखा आणि नगर पालिकेने संयुक्त कारवाई हाती घेतली होती. मोकाट जनावरांमुळे होणाऱ्या त्रासापासून सुटका मिळेल, ही अशा वाहन चालकांसह पादचाऱ्यांना होती. मात्र, प्रशासनाने पहिल्या टप्प्यातच ही कारवाई मोहीम गुंडाळून ठेवली. दुसरीकडे मोकाट कुत्र्यांचे निर्बिजिकरण करण्याबाबत नगर पालिकेच्या सभागृहात चर्चेचे गु-हाळ गाळण्यात आले. त्याबाबत कारवाईची आश्वासने देण्यात आली. मात्र, ही आश्वासने त्या बैठकीच्या सभागृहातच विरली. प्रत्यक्षात मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची कारवाई झाली नाही. एकीकडे पालिका प्रशासन मोकाट जनावरांचा बंदोबस्त करीत नाही. तर दुसरीकडे कुत्र्यांनी लचके तोडल्याने जखमी होणारे १० ते १२ जखमी रुग्ण दररोज जिल्हा रुग्णालयात दाखल होत आहेत. गत २१ दिवसात एक दोन नव्हे तब्बल २६९ रुग्ण जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले होते. शहर, परिसरातील शाळकरी मुले, महिलांसह सर्वसामान्यांना मोकाट कुत्रे आणि जनावरांचा त्रास सहन करावा लागत असून, पालिका प्रशासनाने मोकाट कुत्र्यांचा बंदोबस्त करावा, अशी मागणी होत आहे.
२१ दिवसांत २६९ जणांना कुत्र्यांचा चावा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 09, 2020 12:05 AM