जिल्हाधिकारी कार्यालयात सोमावारी पालकमंत्री टोपे यांच्या अध्यक्षतेखाली कोरोना संदर्भातील आढावा बैठक घेण्यात आली. यावेळी केंद्रीय राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांची या बैठकीस प्रमुख उपस्थिती होती. यावेळी जिल्हाधिकारी रवींद्र बिनवडे यांनी कोरोनाचा सविस्तर आढावा सादर करून केलेल्या उपाययोजनांची माहिती दिली.
पालकमंत्री टोपे म्हणाले, जालना जिल्ह्यामध्ये कोरोनाबाधितांचे प्रमाण कमी होत असल्याचे दिसत आहे. परंतु यंत्रणेने गाफील न राहता कोरोनाचा संसर्ग वाढू नये यासाठी आवश्यक ती खबरदारी घ्यावी. शासनाने १५ जूनपर्यंत निर्बंधामध्ये वाढ केली असून, त्याचे पालनही शासनाच्या निर्देशानुसार होईल, असे टोपे म्हणाले. यावेळी सर्व खातेप्रमुख उपस्थित होते.
चौकट
दानवेंकडून यंत्रणेचा समाचार
केंद्रीयमंत्री रावसाहेब दानवे यांनी आजच्या बैठकीत अनेक महत्त्वाचे मुद्दे उपस्थित केले. त्यात रेमडेसिविरची माहिती मागूनही ती मिळत नसल्याचे सांगून आता नवीन बुरशीजन्य आजार फैलावत असतानाही यंत्रणा काहीच करत नसल्याबद्दल त्यांनी नाराजी व्यक्त केल्याचे सांगण्यात आले. यावेळी त्यांनी काही रुग्णालये ही रुग्णांकडून अव्वाच्या सव्वा बिले आकारत असल्याच्या तक्रारी असून, त्यांची पडताळणी करण्याचे सांगितले. यावेळी ही पडताळणी केली असून, १८ लाख रुपये हे अतिरिक्त आकारल्याचे दिसून आल्याचे सांगून ते संबंधित रुग्णालयांनी परत करावेत, असे आदेश काढल्याचे जिल्हाधिकारी बिनवेडे यांनी सांगितले. आज अनेकजण तोंडाला मास्क न लावता फिरत असल्याचे चित्र असून, ही बाब गंभीर असल्याचे दानवेंनी निदर्शनास आणून दिले.