जालना - सोमवारी झालेल्या वादळी वाऱ्यामुळे रब्बी हंगामातील गहू, हरभरा, मका पिकाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले आहे. अचाकन वातावरणात झालेल्या बदलाने गावोगोवी एकीकडे होळी पेटली असतानाच काही ठिकाणी वीजांच्या कडकडाटासह पाऊसही पडला. अनेक ठिकाणी गारांनीही परिसराला झोडपल्याचं पाहायला मिळालं. त्यामुळे, काही भागांत काश्मीरसदृश्य दृश्य दिसत होते. काळ्या मातीवर बर्फाने चादर ओढली की काय असेच दृश्य होते. मात्र, या गारपीटीमुळे शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं असून रब्बीची पीके खराब झाली आहेत. आता, राज्याचे कृषिमंत्री अब्दुल सत्तार यांनी अवकाळीग्रस्त शेतकऱ्यांना मदतीचं आश्वासन दिले असून पंचनाम्याचे आदेश प्रशासनाला दिले आहेत.
राज्यात काही ठिकाणी वादळी वारा, गारपिटीसोबत पावसाच्या सरी बरसल्या आहेत. त्यामुळे शेतकरी संकटात सापडला असून या नुकसानग्रस्त शेतकऱ्याच्या पिकांचे पंचनामे करण्याचे आदेश कृषीमंत्री अब्दुल सत्तार यांनी दिले आहेत. तसेच, नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असेही कृषिमंत्र्यांनी माध्यमांशी बोलतांना सांगितले. गेल्या दोन दिवसांपासून वातावरणात बदल झाल्याने राज्यातील काही भागात पावसाचा अंदाज व्यक्त केला जात होता. मध्यरात्रीपासून ढगांचा गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह अवकाळी पावसाने हजेरी लावली.
अवकाळी पावसामुळे रब्बी हंगामातील कांदा, गहू, हरभरा, आंबा, द्राक्षं यांसह भाजीपाल्याला मोठा फटका बसण्याची शक्यता नाकारता येणार नाही. या पार्श्वभूमीवर नुकसानीचे पंचनामे करण्याचे आदेश संबंधित विभागाला दिले असून नुकसानभरपाई संदर्भात मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री लवकरच निर्णय घेतील, असे स्पष्ट करीत नुकसानग्रस्त शेतकऱ्यांनी चिंता करू नये राज्य सरकार शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीरपणे असल्याचे मंत्री अब्दुल सत्तार म्हणाले.
विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातही नुकसान
राज्यातील विदर्भ, मराठवाड्यासह उत्तर महाराष्ट्रातील काही ठिकाणी गारपीट झाली. बीड जिल्ह्यातील गेवराई तालुक्यातील बंगाली-पिंपळा, कवडगांव, सुशी, वडगाव, चिखली, कोळगाव, पाडळसिंगी, मादळमोही, धोंडराई, उमापूर, कुंभेजळगाव, तलवाडा सह तालुक्यातील अनेक गावातील परिसरात सोमवारी सायंकाळी जोरदार वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस होवून काही ठिकाणी गारपीट झाली. तर, उत्तर महाराष्ट्रातील दोन जिल्ह्यातही गारपीट झाली. याचा एक व्हिडीओ समोर आला असून काश्मीरसृश्य दृश्य दिसून येते. धुळे जिल्ह्यातील खोरी टिटाने परिसरामध्ये प्रचंड गारपीट झाली. गारपिटीनंतर काश्मीरसारखी सर्वत्र बर्फाची चादर पसरलेली पाहायला मिळाली. एक तास चाललेल्या गारपीटीने परिसरात शेतमालाचे मोठं नुकसान केलं आहे. धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यातील काही भागात प्रचंड गारपीट झाली आहे. सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास सुरू झालेल्या या गारपिटीने शेतकऱ्यांचं मोठं नुकसान झालं आहे.