रस्त्याला भेगा
जालना : जालना ते देऊळगाव राजा या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. या रस्त्याचे काम नुकतेच झाले आहे. काही दिवसात रस्त्यावर भेगा पडल्याने नाराजी व्यक्त केली जात आहे. या रस्त्याचे काम निष्कृष्ट दर्जाचे होत असून, वरिष्ठ अधिकाऱ्यांनी याकडे लक्ष द्यावे, अशी मागणी केली जात आहे.
बंधाऱ्याचे काम सुरू करण्याची मागणी
राणी उंचेगाव : घनसावंगी तालुक्यातील मुढेगाव येथील दुधना नदीवर कोल्हापुरी बंधाऱ्याचे काम जेथे मंजूर आहे. त्याच ठिकाणी त्वरित काम चालू करण्यात यावे नसता दुधना नदीत आमरण उपोषण करू, असा इशारा भाजप किसान मोर्चाचे जिल्हाध्यक्ष अंकुश बोबडे, कैलास शेळके, जगनाथ मुळे, पिराजी मरकड, विलास चव्हाण, आक्रम पटेल आदींनी दिला.
सेनेची ऑनलाईन आढावा बैठक
जालना : महाराष्ट्र राज्य शिक्षक सेना जिल्हा व तालुका पदाधिकारी यांची विविध शैक्षणिक प्रश्नासंदर्भात ऑनलाईन आढावा बैठक शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष तथा अल्पसंख्यांक आयोगाचे अध्यक्ष ज. मो. अभ्यंकर यांनी घेतली. यावेळी राज्य समन्वयक नितीन चौधरी, अजित चव्हाण, प्रा. गोविंद काळे, माणिक सेलुकर, सुधाकर कापरे, नामदेव सोनवणे, विठ्ठल बदर आदींची उपस्थिती होती.
अवकाळी पावसामुळे फळपिकांचे नुकसान
अंबड : गत आठवड्यापासून तालुक्याच्या विविध भागात अवकाळी पाऊस, गारपीट होत आहे. या अवकाळी पावसात फळपिकांना मोठा फटका बसला आहे. केलेला खर्चही वाया जात असून, रोगराई पडण्याची भीती व्यक्त केली जात आहे. प्रशासनाने याकडे लक्ष देऊन झालेल्या नुकसानीचे पंचनामे करीत भरपाई द्यावी, अशी मागणी तालुक्यातील शेतकरी करीत आहेत.
परतूर येथे एलसीबीची कारवाई
परतूर : शहरातील भाजी मंडई परिसरात कल्याण नावाचा मटका जुगार खेळवताना एकाला स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने रंगेहात पकडले आहे. राहिमखान गफारखान (रा. इंदिरानगर, परतूर) असे सदरील व्यक्तीचे नाव आहे. त्याच्याकडून जुगाराचे साहित्य आणि रोख ७ हजार ४३० रुपये जप्त करण्यात आल्याची माहिती देण्यात आली.
लिंगायत समाजाच्या स्मशानभूमीची साफसफाई
पारडगाव : घनसावंगी तालुक्यातील पारडगाव येथील लिंगायत समाजाची स्मशानभूमीत झाडेझुडपे वाढल्यामुळे दफन विधी करण्यासाठी अडचण निर्माण होत होती. त्या अनुषंगाने लिंगायत समाजाच्या लोकांनी एकत्र येऊन स्वखर्चाने जेसीबी लावून झाडे काढून लेव्हलिंग करण्यास सुरुवात केली. यावेळी किशोर स्वामी, भारत स्वामी, राजू स्वामी, वैजनाथ स्वामी, रामेश्वर ढेरे, अनिल सातपुते, महालिंग स्वामी, मधुकर दरेकर उपस्थित होते.