जालना : शहरातील प्रमुख मार्गांसह बाजारपेठेतील मार्गांवर मोकाट जनावरांचा वावर वाढला आहे. परिणामी वाहतूक कोंडीचे प्रकार वाढत असून, अपघाताचाही धोका वाढला आहे. त्याशिवाय पादचारी नागरिकांनाही कसरत करीतच रस्ता पार करावा लागत आहे.
उद्योगनगरी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या जालना शहरातील प्रमुख मार्गांसह अंतर्गत भागातही मोकाट जनावरे आणि कुत्र्यांचा वावर वाढला आहे. मोकाट जनावरे प्रमुख मार्गांसह अंतर्गत भागातील रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. परिणामी वाहन चालकांना जनावरांना चुकवून वाहने चालविताना कसरत करावी लागत आहे. त्यामुळे वाहतूक कोंडी होण्यासह अपघाताचा धोका अधिक वाढत आहे. शिवाय काही जनावरे अचानक हल्ला करीत असल्याने पादचाऱ्यांनाही जीव मुठीत घेऊन रस्ता शोधण्याची वेळ आली आहे.
मोकाट जनावरांचा वाली कोण?
शहरातील विविध भागांत मोकाट जनावरे सोडली जातात. अनेक जनावरे रात्रभर विविध मार्गांवर ठाण मांडून असतात. यापूर्वी पालिकेने मोकाट जनावरे सोडू नयेत, अशा सूचना संबंधितांना दिल्या आहेत; परंतु पालिकेच्या सूचनांचे उल्लंघन करीत अनेक जण जनावरे सोडून देत आहेत. रात्रभर रस्त्यावर वावरणाऱ्या जनावरांचे वाली कोण, असा प्रश्न निर्माण होत आहे.
या मार्गावर वाहने जपून चालवा
भोकरदन नाका बसस्थानक
मुख्य बाजारपेठ
गांधी चमन ते कचेरी रोड
शनी मंदिर ते नूतन वसाहत
शहरांतर्गत इतर मार्ग
संयुक्त कारवाईही बंदच
शहरातील विविध मार्गांवरील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करण्यासाठी नगरपालिका व शहर वाहतूक शाखेच्या पथकाकडून संयुक्त कारवाई सुरू करण्यात आली होती; परंतु मध्यंतरी कोरोनाचा प्रादुर्भाव वाढल्याने ही कारवाई बंद करण्यात आली आहे. रस्त्यावर येणारी मोकाट जनावरे पाहता पुन्हा एकदा ही कारवाई सुरू करणे गरजेचे आहे.
लवकरच कारवाई
पालिकेचा कोंडवाडा दुरुस्त करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. तात्पुरत्या स्वरूपात गोशाळांशी बोलणे सुरू आहे. त्यांनी होकार दिल्यानंतर तत्काळ शहरातील मोकाट जनावरांविरुद्ध कारवाईची मोहीम राबविली जाणार आहे.
- नितीन नार्वेकर, मुख्याधिकारी