जालना : शहरातील व्यापारी महावीर गादिया यांच्या मुलाचे बुधवारी अपहरण झाल्याने खळबळ उडाली होती. पोलिसांनी अवघ्या चार तासांत मुलाची अपहरणकर्त्यांच्या तावडीतून सुटका केली. याप्रकरणी पोलिसांनी गादिया यांच्या ड्रायव्हरसह तिघांना ताब्यात घेतले तर एकजण फरार आहे. यापूर्वीच या आरोपींनी गादिया यांना दोनदा लूटण्याचा प्रयत्न केला होता. परंतु, त्यांचा हा प्रयत्न फसला. शेवटी त्यांनी बुधवारी मुलाच्या अपहरणाचा कट रचला. परंतु, तोही पोलिसांनी हाणून पाडला. अक्षय अंकुश घाडगे, अर्जुन अंकुश घाडगे (दोघे रा. बारसवाडा, ता. अंबड) व संदीप आसाराम दरेकर (२६, रा. वाल्हा, ता. बदनापूर) अशी ताब्यात घेतलेल्या संशयितांची नावे आहेत.
अक्षय घाडगे याचे मामा-मामी महावीर गादिया यांच्याकडे गेल्या अनेक वर्षांपासून काम करतात. सहा ते सात महिन्यांपूर्वी गादिया यांनी अक्षयच्या मामाला कामावर ड्रायव्हर पाहण्यास सांगितले होते. यावेळी त्यांनी माझा भासा अक्षय घाडगे ड्रायव्हर म्हणून काम करू शकतो, असे सांगितले. पाच महिन्यांपूर्वी अक्षय ड्रायव्हर म्हणून कामाला होता. मामा-मामी अनेक वर्षांपासून कामाला असल्याने महावीर गादिया यांनी अक्षयवर विश्वास ठेवला. त्याच्या देखत लाखो रुपयांचे व्यवहार व्हायचे. हे सर्व पैसे पाहून त्याने चोरीचा प्लॅन आखला. ही बाब आपल्या सख्या भावासह मित्रांना सांगितली. त्यानंतर त्यांनी लूटमारीचा प्लॅन आखला.
दोनवेळा त्यांनी गादिया यांना लुटण्याचा प्रयत्न केला होता; परंतु, त्यांचा हा प्लॅन यशस्वी झाला नाही. अक्षय हा गादिया यांचा मुलगा स्वयंम याला नेहमी शाळेत सोडायचा. गेल्या काही दिवसांपासून त्याचे सीबीएसईचे पेपर सुरू होते. याच काळात अक्षय त्याला कारने ने-आण करायचा. हीच संधी साधून त्यांनी स्वयंमच्या अपहरणाचा कट रचला व गादिया यांना जवळपास ४ कोटी रूपयांची खंडणी मागितली. परंतु, पोलिसांच्या सतर्कतेमुळे त्यांचा हा प्लॅन फसला, अशी माहिती पोलिसांनी दिली आहे. स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकाने तिघांना बुधवारी रात्री अटक केली.