लोकमत न्यूज नेटवर्कजाफराबाद : जाफराबाद तालुक्यात पिण्याच्या पाण्यासोबत जनावरांसाठी लागणाऱ्या चाऱ्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. खरीप हंगामात पावसाचे प्रमाण सरासरीपेक्षा कमी असल्याने दुष्काळ जाहीर करण्यात आला आहे. परंतु, त्या करिता लागणा-या उपाय योजनांकडे लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यात आहे.कमी पावसाअभावी खरीप हंगामात येणारे मका पीक आणि रबी हंगामातील शाळू ज्वारी पिकाची लागवड शेतकऱ्यांना करता आली नाही. म्हणून चा-याचे भाव गगनाला भिडले आहे. जाफराबाद तालुक्यात चा-याचे भाव प्रति शेकडा तीन हजार रुपये होऊन सुद्धा चारा मिळत नाही. त्यामुळे जनावरांसाठी लागणा-या चा-याची सुध्दा टंचाई निर्माण झाली आहे. शेतकरी चा-यासाठी शोधा- शोध करत आहेत. दुष्काळी अनुषंगाने इतर जिल्ह्यात जनावरांकरिता शासनाने चारा छावण्या सुरू केल्या आहेत. परंतु, जालना जिल्ह्यात अद्यापही चारा छावण्या सुरु करण्यात आलेल्या नाही.जाफराबाद तालुक्यात अद्यापही चारा छावण्याची मागणी करण्यात आली नसल्याचे तहसील कार्यालयाने सांगितले. दरम्यान, सध्या तालुक्यात लोकसभा निवडणुकीचा धूमाकूळ सुरु आहे. त्यामुळे राजकीय नेत्यांसह प्रशासनही निवडणूकीच्या कामात दंग आहे. परिणामी, तालुक्यात पडलेल्या भीषण दुष्काळाकडे दुर्लक्ष होत असल्याचे चित्र सध्या तालुक्यात दिसत आहे.जाफराबाद तालुक्यात १०१ गावांपैकी ७० गावांत भीषण पाणी टंचाई आहे. ५० गावात टँकरद्वारे पाणीपुरवठा करण्यात येत आहे. तर २० गावात विहीर अधिग्रहण करून पाणीपुरवठा होत आहे. ७० गावा करिता ७३ खाजगी विहिरी अधिग्रहण करण्यात आल्या आहेत. असे असले तरी तालुक्यातील नागरिकांना मोठ्या प्रमाणात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र आहे. काही नागरिकांनी तीन ते चार किलो मीटर पायपीट करावी लागत आहे. याकडे मात्र, प्रशासनाचे दुर्लक्ष दिसत असल्याचे चित्र सध्या जाफराबाद तालुक्यातील आहे.
लोकसभा निवडणुकीच्या धामधुमीत दुष्काळाकडे होत आहे दुर्लक्ष !
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 30, 2019 12:30 AM