- शेषराव वायाळ, शेवगा, ता. परतूर, जि. जालना
खरीप हातचे गेले, रबीचा पत्ता नाही. सोयाबीन करपले, कपाशीला पाते, बोंड नाही. तुरीचा भरवसा नाही. थोडाबहुत उभा असलेला ऊस जनावराचा चारा होण्याच्या मार्गावर. पिण्यासाठी वर्षभर टँकरचेच पाणी. गावाजवळ छोटे धरण. त्यातही केवळ दहा टक्के साठा. परतूर तालुक्यातील शेवगा येथील ही दुष्काळस्थिती.
परतूर शहरापासून ५ कि.मी. अंतरावर असलेले हे गाव तसे सधन. मजुरांची संख्या फारशी नाही. स्वत:ची शेती करून उदनिर्वाह करणाऱ्यांचीच संख्या अधिक़ पावसाने पाठ दाखविल्याने सारेच चित्र बदलले. ‘लोकमत’ प्रतिनिधीने गावात प्रवेश करताच चार-पाच महिला डोक्यावर पाण्याने भरलेले हंडे घेऊन शेतात जाताना दिसल्या. शेतात पिण्यासाठी पाणीच नाही. खरेतर गावातही पिण्यायोग्य पाणी नाही. क्षार असल्याने हे पाणी पिल्याने हाडे ठिसूळ होऊन दात पिवळे पडतात. त्यामुळे वर्षभर गावची तहान टँकरवरच भागते.
गावाजळील धरणातही पिण्यायोग्य नाही. यावर्षी तर या धरणात केवळ १० टक्केच साठा आहे. गावाला वळसा घालणारी नदी कोरडीठाक आहे.या गावची यंदाची पैसेवारी २२.१७ टक्के. यावर्षी पाऊस खूपच कमी झाला. तोही सर्वत्र सारखा नाही. त्यामुळे विहिरी, बोअर, तलावांची पाणी पातळी वाढलीच नाही. खरिपाची पेरणी केली. सुरुवातीच्या पावसाने पिके जोमदार दिसू लागली. त्यामुळे खते, औषधीवर शेतकऱ्यांनी मोठा खर्च केला. नंतर मात्र पावसाने पाठ फिरविल्याने सोयाबीन करपले. कपाशीला बोंड लागले नाही. एका वेचणीत कापसाचे पीक उपटावे लागणार. चाळीस-पन्नास एकरांवर असलेला ऊस जनावरांचा चारा होणार.
तूर व इतर सर्वच पिके हातची गेली आहेत. शेतात ओलच नसल्याने रबी ज्वारी, हरभरा, गहू आदी पिकांची पेरणी होणे शक्य नाही. सध्या शाळू ज्वारी पेरणीचा हंगाम आहे. मात्र, या गावच्या शिवारात एकही तिफण दिसली नाही. ‘पाऊस पडो अथवा ना पडो, ज्वारी उगवो अथवा ना उगवो मात्र काळ्या आईची ओटी भरावी लागते. म्हणून केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागेल,’ असे शेतकरी सांगत होेते. गावशिवारात करपलेले सोयाबीन काढणीचे काम शेतकरी पती-पत्नी घरीच करीत होते. मजुरांसाठी पैसे आणणार कोठून, हा त्यांचा प्रश्न.
परतूर तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावरशेवगा गावासारखीच बामणी, शेलवडा व वलखेड या गावांची पैसेवारी. या गावांतही शेतकऱ्यांची भयाण अवस्था आहे. संपूर्ण परतूर तालुक्याची पैसेवारी पन्नास टक्क्यांखाली आली असल्याने हा तालुका दुष्काळाच्या उंबरठ्यावर उभा आहे.
सर्वच पिकांची परिस्थिती वाईटतालुक्यातील सर्वच पिकांची वाईट परिस्थिती आहे. आमचे पीक कापणी प्रात्यक्षिक सुरू आहे. काही पिके साठ, तर काही सत्तर टक्के हातची गेली आहेत.-विजयकुमार वाघमारे, तालुका कृषी अधीकारी
पाच वर्षांतील पर्जन्यमान (मि.मी.मध्ये)२०१४ - ४४६.६ २०१५ - ४९४.८२०१६ - ९०२.६२०१७ - ६३८ २०१८ - ४४५.८
बळीराजा म्हणतो?हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयंकर आहे. ७२ च्या दुष्काळात पाणी तरी होेते. शेतकऱ्यांपुढे यावर्षी अन्न, चारा, पाणी, अशी सर्वच संकटे एकत्रित उभी राहिली आहेत. -अशोकराव धुमाळ
खरिपाची पिके हातची गेली. आता रबीची पेरणी होत नाही. केवळ जमिनीची ओटी भरण्यासाठी पेरणी करावी लागणार आहे. -प्रभाकर धुमाळ
चार एकर शेती. मजुरांना काय देणार अन् आपण काय खाणार? पाऊस नसल्याने कोणत्याच मालाला उतारा नाही. -रामप्रसाद धुमाळ
शेतात कोणतेच पीक आले नसल्याने शेतकऱ्यांवर मजुरी करण्याची वेळ आली आहे. अशी परिस्थीती मी कधीच पाहिली नाही. -परमेश्वर धुमाळ
गावातील तरुणही हवालदिल झाले आहेत. मुलांच्या शिक्षणाच्या खर्चाचा मोठा प्रश्न आहे. घरातील होते ते सर्व पैसे शेतात गुंतवले. आता वर्षभर घरखर्च कसा भागवणार? -दत्ता धुमाळ