- फकिरा देशमुख, बरंजळा साबळे, ता. भोकरदन, जि. जालना
जालना जिल्ह्यातील खरिपाचा तालुका म्हणून भोकरदन तालुक्याची ओळख. या तालुक्यातील ६० टक्के शेतकरी हे खरिपाच्या पिकांवर अवलंबून आहेत. यंदा पाऊसच न झाल्याने तालुक्यातील बरंजळा साबळे परिसराला दुष्काळाचा मोठा फटका बसला आहे. पावसाअभावी शेतकऱ्यांना उभे पीक उपटून टाकावे लागले. परतीचा पाऊस न झाल्याने रबीच्याही आशा मावळल्या आहेत.
‘लोकमत’ प्रतिनिधीने बरंजळा साबळे या गावाची पाहणी केली तेव्हा ही दुष्काळस्थिती समोर आली. या गावाची पैसेवारी ४६ टक्के आली आहे. यामुळे रबीचे पीक येईल, याची अजिबात शक्यता नाही. तालुक्याची पावसाची अपेक्षित सरासरी ६८८़१२ मि़मी़ आहे. मात्र, या पावसाळ्यात केवळ ३६५़७५ मि़ मी़ एवढाच पाऊस झाला. त्यात बरंजळा साबळे परिसरात तर आणखी कमी झाला. शेतकऱ्यांनी विहिरीच्या पाण्यावर कपाशी, सोयाबीन पिकांचे संगोपन केले. मात्र, ऐन दाणे भरण्याच्या वेळेत पाऊस न झाल्याने सोयाबीनच्या उत्पन्नावर परिणाम झाला आहे. पन्नास टक्क्यांनी उत्पन्न घटले. त्यातच विहिरींचे पाणी तळाला गेल्याने कपाशी पिकाने माना टाकल्या. कपाशीचे उत्पन्नच हाती लागणार नसल्याने बहुतांश शेतकऱ्यांनी कपाशीचे पीक उपटून शेत मोकळे केले. मात्र, परतीचा पाऊस न झाल्याने शेतकऱ्यांच्या रबीच्या आशा मावळल्या आहेत. यामुळे संपूर्ण गावावर दुष्काळाचे संकट आहे. शेतीला लावलेला खर्चही निघाला नसल्याने शेतकरी हैराण झाले आहेत.
मक्याचा झाला चारापावसाअभावी मका पिकाला कणसे लागले नाही. यामुळे शेतकरी त्याचा जनावरांसाठी चारा म्हणून उपयोग करत आहे.
टँकर बंद होईनातालुक्यात सतत तीन वर्षांपासून म्हणावा तसा पाऊस न झाल्याने अनेक गावांत टँकर सुरू आहेत. उन्हाळ्यात यात वाढ होण्याची शक्यता आहे. मात्र, जनावरांसाठी पाणी व चाऱ्याचा प्रश्न येत्या काळात गंभीर बनणार आहे.
रबीच्या पेरणीला फटका
यावर्षी तालुक्यात पन्नास टक्के पावसाची नोंद आहे. यामुळे खरिपाच्या उत्पन्नात ५० टक्के घट झाली आहे. याचा फटका रबीच्या पेरणीला बसण्याची शक्यता आहे. तालुक्यातील बहुतांश प्रकल्प कोरडेठाक असल्याने पाणीटंचाईचे संकट आहे. - डी.बी. व्यवहारे, तालुका कृषी अधिकारी
बळीराजा काय म्हणतो?
- परिसरावर दोन वर्षांपासून निसर्ग कोपलेला आहे. खरीप पिकांसाठी केलेला खर्चसुद्धा निघाला नाही. उलट कपाशी उपटून टाकण्यासाठी मकाचा चारा व सोयाबीन जमा करण्यासाठी सुद्धा घरातून पैसे टाकावे लागले. खरीप तर गेलेच पावसाअभावी आम्ही रबीच्या आशा सुद्धा सोडल्या आहेत. - नारायण साबळे सरपंच
- चार एकरात कपाशीची लागवड केली आहे. पावसाअभावी पिकांची वाढच खुंटल्याने कपाशीला बोंडे, फुले आलीच नाही. यामुळे शेतीत लावलेला खर्च वाया गेल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. - माधवराव गिरनारे
- उन्हाळ्याच्या दिवसामध्ये पाणीटंचाई व दुष्काळाचे चटके बसत होते. मात्र, या वर्षी पावसाळ्यातच दुष्काळाचे चटके बसू लागले आहे. पुरेशा पावसाअभावी पिकांचे मोठे नुकसान झाल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. आतापासून पिण्याच्या पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. जनावरांना पाण्यासाठी तीन किलोमीटरपर्यंत घेऊन जावे लागत आहे. - पुंंजाराम साबळे
- आतापर्यंत अनेक दुष्काळाचा सामना केला आहे. १९७२ च्या दुष्काळात धान्याचा तुटवडा होता. मात्र, पिण्यासाठी पाणी होते. यावर्षी अन्नधान्य आहे, मात्र पिण्याच्या पाण्याची कमतरता असल्याने परिस्थिती गंभीर आहे. - माणिकराव गिरनारे
- सध्या पाते फुलावर आलेल्या कपाशीला पावसाची आवश्यकता असताना पावसाने दडी दिल्याने कपाशीचे मोठे नुकसान झाले. यामुळे चार एकरातील कपाशीचे पीक उपटून टाकावे लागले. पाऊस पडल्यावर रबीमध्ये शाळू ज्वारीचे पीक घेऊ असा विचार होता. मात्र, परतीच्या पावसाने पाठ फिरविली.- त्र्यंबकराव साबळे