- दिलीप सारडा, वाकुळणी, ता. बदनापूर, जि. जालना
बदनापूर तालुक्यातील वाकुळणी हे पांढरे सोने पिकविणारे गाव म्हणून तालुक्यात ओळखले जाते. यंदा चांगला पाऊस पडेल अशी हवामान खात्याने वल्गना केल्याने परिसरात शेतकऱ्यांनी मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड केली होती. मात्र पुरेशा पावसाअभावी कपाशीसह इतर पीकही शेतकऱ्यांच्या हातून गेल्याने पांढरे सोने पिकविणाऱ्या वाकुळणीत दुष्काळाचा काळोख पसरला आहे.
पिकांच्या पेरणी व मशागतीकरिता शेतकऱ्यांनी विविध बँका, खाजगी सावकारांकडून चक्रवाढ व्याजाने कर्ज काढले. हवामान खात्याने वर्तविलेल्या अंदाजामुळे मोठ्या प्रमाणात कपाशीची लागवड करण्यात आली. मात्र पावसाने वक्रदृष्टी केल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरीप हंगामाची पिके गेली आहे. या गावची आणेवारी ४५ एवढी आहे. शेतकऱ्यांनी आपल्या घरात जेवढे पैसे होते तेवढे शेतीत लावल्यामुळे व आता शेतातून कवडीचेही उत्पन्न येणार नसल्यामुळे शेतकरी हवालदिल झाले आहेत.
बँकेचे आणि सावकाराचे कर्ज कसे फेडणार याची चिंता शेतकऱ्यांना सतावत आहे. रबीच्या उत्पन्नातून ही तूट भरून काढू, अशी आशा शेतकऱ्यांना होती. मात्र परतीच्या पावसाने दडी मारल्याने परिसरात रबीच्या पेरण्या खोळंबल्या. पुरेसा पाऊस न पडल्याने शेतात जनावरांसाठी चारा नाही. नदी-नाले कोरडेठाक पडल्याने पाण्याचीही टंचाई जाणवत आहे. मुक्या जनावरांना खायला चारा नाही. कपाशीची मोठ्या प्रमाणावर लागवड केली असून, त्याचा चारा म्हणूनदेखील उपयोग होत नाही. वाळलेले गवतसुद्धा शेतात नसल्यामुळे पुढे पशुधन कसे जगवायचे हा मोठा प्रश्न शेतकरी वर्गासमोर उभा आहे.
- ४८३.३० मि. मी. पाऊस तालुक्यात यंदा पडला आहे- ६८५- मि.मी. इतकी तालुक्याची पावसाची वार्षिक सरासरी आहे - १२२८,५६ - हेक्टर इतके एकूण भौगोलिक क्षेत्र वाकुळणी या गावाचे आहे- ११४४.९७ - हेक्टर लागवडीलायक क्षेत्र - ७३३ - हेक्टरमध्ये कापूस- २७- हेक्टरवर तूर - ९ - हेक्टर उडीद-१४५ - हेक्टर सोयाबीन- २१ - हेक्टर मूग- १८ - हेक्टर बाजरी-६ - हेक्टरवर मका
मोसंबी, डाळिंब फळबागा नष्ट होण्याच्या मार्गावर वाकुळणी शिवारात विहिरींच्या पाण्याची पातळी दिवसेंदिवस खोलवर जात आहे. उन्हाळा सुरू व्हायच्या आधीच विहिरी कोरड्या पडत आहेत. या गावातील शेतकऱ्यांनी यावर मात करण्यासाठी सुमारे ६५ ते ७० शेततळे घेतले. शेततळ्याचे गाव अशी प्रतिमा तयार झाली. मात्र यावर्षी पाऊस नसल्यामुळे हे शेततळे कोरडे पडले आहेत. एकेकाळी मोसंबी उत्पादक अशी या गावाची ओळख होती. मात्र आता मोसंबी, डाळिंब अशा फळबागा नष्ट होत आहेत.
बळीराजा काय म्हणतो?
- आमची एकत्र कुटुंब पद्धती असून, मी व माझे मोठे बंधू दोघे शेती करतो. आम्ही आठ एकर क्षेत्रावर कपाशीची लागवड केली. बोंडं लागण्याच्या अवस्थेत असताना पाऊस झाला नाही. परिणामी कापसाची वाढ खुंटली. झाडे सुकली. त्यामुळे आमचे शंभर क्विंटल कापसाचे उत्पन्न बुडाले आहे़ - नारायण रामराव अवघड
- सध्या पाऊस कमी पडल्यामुळे शेतकऱ्यांच्या हातून खरिपाचे पीक गेले आहे. तसेच जमिनीत ओल नसल्याने रबीच्या पेरण्या खोळंबल्या आहेत. शेतीमालाला शासनाने हमीदरापेक्षा दुपटीने भाव देऊन शेतकऱ्यांचे आर्थिक नुकसान भरून काढावे. - बाळासाहेब भानुदास वैद्य
पुरेशा पावसाअभावी शेतात जनावरांसाठी चारा शिल्लक राहिलेला नाही. आमच्या कुटुंबाकडे किमान १५ जनावरे असून, त्यांच्या चाऱ्याचा व पिण्याच्या पाण्याचा प्रश्न निर्माण होणार आहे. अनेक शेतकरी आता मुक्या जनावरांना सांभाळू शकत नसल्यामुळे आठवडी बाजारात कवडीमोल दराने जनावरांची विक्री करीत आहेत. - प्रमोद संभाजी कोळकर
- पाण्याअभावी माझी मोसंबी व डाळिंबाची फळबाग जळून गेली. तसेच दहा एकर कापसाची लागवड केलेली असून, पाण्याअभावी कपाशीचे पीकही वाळत आहे. त्यामुळे यावर्षी मी फळबाग, कापूस व अन्य पिकांसाठी लावलेला खर्च वाया गेल्याने आर्थिक बजेट बिघडले आहे. - नाथा बाळाजी अवघड
- हा दुष्काळ १९७२ पेक्षाही भयानक आहे. आगामी काळात पिण्याच्या पाण्याचा गंभीर प्रश्न समोर येणार आहे. शेतमजुरांच्या हाताला कामे नसल्याने मजुरांचे स्थलांतर वाढले आहे. - किसनअप्पा श्रीरंग कोळकर