- प्रकाश मिरगे, म्हसरूळ, ता. जाफराबाद, जि. जालना
यंदा चांगला पाऊस पडेल असा अंदाज वर्तविला होता आणि तो प्रारंभी खराही ठरला. त्यामुळे जूनमध्ये अनेक शेतकऱ्यांनी मोठ्या उत्साहाने पेरणी केली. मात्र, नंतर पावसाने हुलकावणी दिल्याने निसर्गाने दिले अन् निसर्गानेच हिरावले असे म्हणण्याची वेळ जाफराबाद तालुक्यातील म्हसरूळ येथील शेतकऱ्यांवर आली.
म्हसरूळ गावात बारा महिन्यांपासून पिण्याच्या पाण्याचे टँकर सुरू आहे. या गावात १९७२ नंतर पहिल्यादांच निसर्गाचा असा प्रकोप पाहावयास मिळत असल्याचे शेतकरी सांगत आहेत. पुरेशा पावसाअभावी खरिपाच्या सर्वच पिकांना फटका बसल्याने शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत. गावाचे जीवनमान शेतीव्यवसावर अवलंबून आहे. मात्र, सलग चार वर्षांपासून गावात पावसाने पाठ फिरवल्याने पिकांच्या उत्पन्नात घट आली आहे. लाखो रुपयांचे बियाणे, खते टाकूनही पावसाअभाची मुद्दलही निघाले नाही. यामुळे शेतकऱ्यांची आर्थिक घडी विस्कटली आहे.
पावसाअभावी शेतीची कामे थंडावली असून, रोजगार हमी योजनेच्या कामांनाही अद्याप प्रारंभ झालेला नाही. त्यामुळे शेतमजुरांवर कामासाठी स्थलांतर करण्याची वेळ येणार आहे. त्यातच शेतीची कामे यंत्राच्या साहाय्याने होऊ लागल्याने आज हाताला काही कामच उरले नाही. म्हसरूळचे पेरणीलायक क्षेत्र १ हजार ६८ हेक्टर असून, प्रमुख पिके कापूस, सोयाबीन, मका आहेत. कापसाने पावसाअभावी जमिनीच्या वर डोके काढले नाही. सोयाबीन फुलात येण्याआधीच करपून गेले आहे. पाऊस न झाल्याने साठवण तलाव कोरडेठाक आहेत. यामुळे आतापासून टँकरची मागणी होत आहे.
खरिपाची पिके हाताची गेली जाफराबाद तालुक्यात खरिपाची पिके पावसाअभावी हाताची गेली आहेत. पावसाअभावी तालुक्यात रबीच्या पेरणीवर परिणाम झाला आहे. शासनाच्या निकषावर दुष्काळी परिस्थितीची पाहणी करण्यात येत आहे. शेतकऱ्यांच्या शेतात जाऊन सर्व्हे करण्यात आला असून, अहवाल शासनाला पाठविण्यात आला आहे. - शेराण पठाण, तालुका कृषी अधिकारी, जाफराबाद
बळीराजा काय म्हणतो?- आतापर्यंतचा हा सर्वात वाईट दुष्काळ आहे. सोयाबीनला एकरी एक ते दीड क्विंटल उतारा मिळत आहे. आशा वेळी जगायचे कसे, हा प्रश्न आहे. - भास्कर गुलाबराव जाधव
- चार-पाच वर्षांपासून परिसरात नदी-नाल्यांना पूर येईल, असा पाऊसच पडला नाही. यामुळे पाणीटंचाईचा सामना नागरिकांना करावा लागत आहे. टँकरने विकत पाणी घेऊन फळबागा जिवंत ठेवल्या आहेत. आता जनावरांच्या पिण्याच्या पाण्याची चिंता सतावत आहे. - साहेबराव भीमराव डोळस
- माझ्याकडे एक हेक्टर शेती आहे. त्यात कापूस, मका या पिकांची लागवड केली होती. कापसाला पाणी आणि कीडनियंत्रणासाठी खर्च झाला. मक्याला एक कणिसही लागले नाही. - सोमनाथ दामोदर चौधरी
- पावसाने हुलकावणी दिल्याने खरिपाच्या सर्वच पिकांचे नुकसान झाले आहे. खर्च करुनही उत्पन्न हाती लागले नाही. शासनाने शेतकऱ्यांना दिलासा देण्याची गरज आहे. - उमेश रमेश पिंपळे
- शासनाने तात्काळ दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना आर्थिक मदत द्यावी. तसेच रोजगार हमी योजनेच्या माध्यमातून शेतमजुरांच्या हाताला काम उपलब्ध करून द्यावे, जनावरांसाठी छावण्या सुरू करण्याची आमची मागणी आहे. - कृष्णा दत्तात्रय लहाने