- संजय देशमुख, खणेपुरी, ता. जि. जालना
गेल्या अनेक वर्षांत जालना जिल्ह्यात अपवाद वगळताच पावसाने सरासरी गाठली आहे. यंदा तर दीड महिन्यापासून पावसाने हुलकावणी दिल्याने खरीप हंगामातील सोयाबीन, मूग, मका, कपाशी, तूर यांचे उत्पन्न निम्म्याने घटण्याची चिन्हे आहेत.
गेल्यावर्षी कपाशीवर हुमणी अळीचा प्रादुर्भाव झाल्याने जालना तालुक्यात शेतकऱ्यांनी यंदा कपाशीऐवजी सोयाबीनला पसंती दिली. पुरेसे पाणी असणाऱ्यांनी कापसाचीच लागवड केली. यंदाही जिल्ह्यातील ६०२ गावांमध्ये बोंडअळीचा हल्ला झाल्याने कपाशीचे उत्पन्न घटणार आहे. जालना तालुक्यातील वाघ्रुळ जहागीर हे सर्कल वगळता अन्य सातही सर्कलमधील पैसेवारी ५० पैशांपेक्षा कमी आली आहे. जालना तालुक्यातील १५१ गावांध्ये खरिपाची पेरणी ही ८८ हजार १३१ हेक्टरवर झाली होती. त्याची पैसेवारी केवळ ४६ आहे.
जालना शहरापासून १३ किलोमीटर अंतरावर असलेल्या खणेपुरी येथे ‘आॅन द स्पॉट’ पाहणी केली. गावाजवळूनच कुंडलिका नदी वाहते. पाऊसच नसल्याने या नदीत पाणी आलेच नाही. कोल्हापुरी बंधारा नसल्यात जमा आहे. गावातील अनेक विहिरींनी आताच तळ गाठला आहे. एकूणच या परिस्थितीमुळे खरीप हातचा गेला आहे. हंगामात शेतीच्या मशागतीपासून ते पिकांनी डोके वर काढल्यावर कीटकनाशक, रासायनिक आणि मिश्र खतांचा डोस देणे, पिकांमध्ये वाढलेले तण काढण्यासाठी निंदणी, खुरपणी यासाठी देखील मोठा खर्च शेतकऱ्यांना करावा लागला. परेणीसाठीचे बियाणे खरेदीचा खर्च तर वेगळाच. डिझेलचे दर वाढल्याने यंदा ट्रॅक्टरने नांगरणीचा खर्चही गेल्यावर्षीच्या तुलनेत वाढला असून, एक हजार २०० रुपये एकरने नांगरणीचा खर्च झाल्याचे शेतकऱ्यांनी सांगितले.
पावसाने पाठ फिरवल्याने यंदा पिकांचे मोठे नुकसान सहन करावे लागले आहे. माणसांसह जनावरांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. सध्या आक्टोबर महिन्यातच अनेक विहिरींनी तळ गाठला असून, टँकर सुरू करण्यासाठीची ओरड सुरू आहे. आता रबी हंगामही धोक्यात आला आहे. येथील अनेक शेतकऱ्यांकडून सोयाबीन, मूग काढून तेथे रबी ज्वारी तसेच गहू लावला जातो. मात्र, यंदा खरीप हंगामातच मुबलक पाऊस न झाल्याने रबीचा विचार करणेही शेतकऱ्यांसाठी जोखमीचे ठरणार आहे.
उत्पादन ६० टक्क्यांवर येणारजालना तालुका हा पूर्वीपासून कमी पावसाचा तालुका म्हणून ओळखला जातो. तालुक्यात एकूण १५१ गावे आहेत. जवळपास ९८ हजार हेक्टरवर खरिपाची पेरणी झाली होती. नुकतीच नजरअंदाज पाहणी केली असता तालुक्यातील वाघु्रळ जहांगीर हे सर्कल वगळता पिकांची परिस्थिती गंभीर आहे. त्यामुळे खरीप हंगामाचे उत्पादन ६० टक्क्यांवर येणार असल्याचे प्राथमिक अंदाजातून दिसून येते. - पी.टी. सुखदेवे, जालना तालुका कृषी अधिकारी
बळीराजा काय म्हणतो?
दमदार पाऊस न पडल्याने खरीप हातातून गेला. त्यामुळे सरकारने तातडीने दुष्काळ जाहीर करून शेतकऱ्यांना वेळीच मदत करावी. - सोपानराव बाबर, सरपंच
तीन एकरावर सोयाबीनची पेरणी केली होती; परंतु वेळेवर पाऊस न पडल्याने शेंगांमध्ये दाणे भरले नाहीत. काढणीचा खर्च एकरी दोन हजार रुपये येणार असल्याने त्यावर नांगर फिरविणार आहे. - गुलाबराव आटोळे
मित्राकडून उसने पैसे घेऊन पेरणी केली. ही उधारी कशी फेडायची, हे सूचेनासे झाले आहे. रबी हंगामही फारसा समाधानकारक नसण्याची चिन्हे आहेत. - भीमराव टापरे
शेती हा व्यवसाय आता पूर्णपणे कोलमडला आहे. त्यामुळे शेती सोडून शेतकरी मोलमजुरीसाठी शहराकडे धावत आहेत. - ज्ञानेश्वर शिंदे
१९७२ चा दुष्काळ अनुभवला आहे. त्यावेळी अशीच भयावह स्थिती होती. त्यावेळी शेतकऱ्यांना मदत म्हणून रोजगार हमीची योजना मदतीला धावून आली होती. यंदा तर त्यापेक्षाही भयावह चित्र आहे. - रामलाल भाकड