लोकमत न्यूज नेटवर्कभोकरदन : भोकरदनहून जाफराबादकडे जाणारी स्वीफ्ट कार (एम. एच. २० डीव्ही ५०३५) शनिवारी सायंकाळी विरेगाव येथील भीषण अपघातापूर्वी अन्य दोन मोटारसायकलस्वारांना धडक दिल्याने त्यातील तीनजण जखमी आहेत. विरेगावजवळ गतिरोधकाजवळ भरधाव वेगात असलेली कार चालकाचा ताबा सुटल्याने उलटी झाली. त्यातच त्या चिमुकल्यांचा अंत झाला. या अपघानंतर संपूर्ण विरेगाव शोकसागरात बुडाले. शनिवारी रात्रीच त्या दोन चिमुकल्यांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.सायंकाळी पाच वाजेच्या दरम्यान माहोरा येथून भोकरदनकडे जाणारी कार विरेगावजवळ उलटली. या अपघातात संतोष गजानन दळवी (वय ७), सोहम रवींद्र थोरात (वय ५) या दोघांचा जागीच मृत्यू झाला. संतोष दळवी हा गजानन दळवींचा एकुलता एक मुलगा होता. त्यामुळे दळवी कुटुंब या घटनेने हादरून गेले. सोहम थोरातच्या परिवारावरही दु:खाचा डोंगर कोसळला आहे. चॉकलेट घेण्यासाठी हे दोघे चिमुकले दुकानावर गेले होते. घरातीलच एका वृध्द इसमाने त्यांना चॉकलेट घेऊन देण्यासाठी म्हणून अविनाश दळवी यांच्या दुकानावर नेले होते. चॉकलेट घेतले आणि हा अपघात झाल्याने त्या मुलांच्या हातातील चॉकेलेट हे दवाखान्यातही तसेच होते. काही कळायच्या आता वाऱ्याच्या वेगाने ही कार उलटल्याने त्या चिमुकल्यांना बाजूला पळण्याची संधीही मिळाली नसल्याचे प्रत्यक्षदर्शीनी सांगितले. दरम्यान याप्रकरणी दोघांना अटक करण्यात आली आहे.अपघात : सर्वत्र हळहळ.. अन् हुंदके..या अपघाताची माहिती मिळताच पोलीस निरीक्षक दशरथ चौधरी, फौजदार वैशाली पवार, गणेश पायघन यांनी भेट देऊन गावकºयांना शांत राहण्याचा सल्ला दिला. कारचालक चंद्रकांत भास्कर साळवे (रा. चांडोळ. जि. बुलडाणा) आणि त्याचा सहकारी विजय जगदेव जाधव (रा. जटवाडा औरंगाबाद) यांना अटक केली. त्यावेळी ते दोघेही मद्यधुंद स्थितीत होते. त्यांच्या कारची झडती घेतली असता त्यातही दारूच्या बाटल्या आढळून आल्याचे पोलिसांनी सांगितले. विरेगाव येथील अपघातापूर्वी या कारचालकाने रवींद्र आणि रूपा सातपुते या दुचाकीवरून जाणा-या पती-पत्नीला जुई धरणाच्या पाटीजवळ जोरदार धडक दिली. त्यात दोघेही जखमी झाले तर मनोज त्रिंबक उबाळे हे पत्नीला घेऊन औरंगाबादकडे जात असताना त्यांनाही या कारने धडक दिल्याने ते देखील किरकोळ जखमी झाले.