लोकमत न्यूज नेटवर्कपरतूर : दुधना नदीच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली असून, अनेक गावांना येणाऱ्या काळात पाणीटंचाईला तोंड द्यावे लागणार आहे.यंदाचा पावसाळा संपत आला तरी परतूर तालुक्यातील अनेक नदी, नाले, तलाव व धरण कोरडेठाक आहेत. ११ आॅक्टोबरपर्यंत पावसाची सरासरी ५१७. ३५ मिमी. नोंद झाली आहे. मागील वर्षी याच तारखेला पावसाची सरासरी ४९४. २० मिमी. होती. या वर्षी सरासरी अधिक दिसत असली तरी हा पाऊस सर्वत्र सारखा नाही. तसेच पावसाचा जोर नसल्याने नद्या नाल्यांना पूर आलेला नाही. त्यामुळे धरण, तलाव कोरडेठाक आहेत. परतूर तालुक्यासह परिसराला वरदान ठरणारा निम्न दुधना प्रकल्प यावर्षी कोरडा दिसत आहे. दमदार पाऊस न झाल्याने या धरणात यावर्षी एक थेंंबही पाणीसाठा वाढला नाही. या धरणावर परतूर, मंठा, सेलूसह परिसरातील नागरिकांची तहान अवलंबून आहे. दुधना काठची गावही सर्वच गावे या धरणाच्या बॅक वॉटरवर अवलंबून आहेत. धरणात पाणी नसल्याने दुधनेच्या पात्रात सतत डबडबणारे बॅक वॉटरही यावर्षी दिसत नसून, पात्र कोरडेठाक पडले आहे. तसेच विहीर, बोअर यांचीही पाणी पातळी वाढली नाही. एकूणच यावर्षी दुधनेच्या कोरड्या पात्राने भविष्यातील पाणीटंचाईची चिंता वाढली आहे.
‘दुधना’च्या कोरड्या पात्राने पाणीटंचाईची चिंता वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 13, 2019 12:00 AM