वडीगोद्री (जि.जालना) : ऊसतोड कामगार न पाठवल्याचा राग मनात धरून महाकाळा येथील मुकादमाचा सोलापूर येथे खून करण्यात आला. ही घटना दोन दिवसांपूर्वी सोलापूर येथे घडली. या प्रकरणी गोंदी पोलीस ठाण्यात गुरुवारी गुन्हा दाखल करण्यात आला आहे.अंबड तालुक्यातील महाकाळा येथील मुकादम रामदास रतन गिरी (३७, रा. महाकाळा) याने सोलापूर येथील संशयित अय्याज पाटील जाफर पाटील (रा.सोलापूर) यांच्या बरोबर चालू गळीत हंगामासाठी ऊसतोड कामगार पुरवण्यासाठी पैसे घेऊन २५ सप्टेंबरला कायदेशीर करार पत्रही करून दिले होते. १८ पुरुष व १८ महिला मजूर पुरविण्याचे या करारात नमूद होते. यासाठी रामदास गिरी यांना आठ लाख रुपये देण्याचे करारानुसार निश्चित करण्यात आले.पैकी दोन लाखांचा भारतीय स्टेट बँकेचा चेक गिरी यांना देण्यात आला. मजुरांना घेऊन जाण्यासाठी संशयिताने सोलापूरहून ५ नोव्हेंबरला शहागड येथे दोन ट्रॅक्टर पाठवले. मात्र, रामदास रतन गिरी यांच्याकडून मजूर उपलब्ध न झाल्याने ट्रॅक्टर परत पाठवले. याचा राग मनात धरून संशयित आरोपी अय्याज पाटील जाफर पाटील हा काही लोकांना सोबत सोमवारी रात्री शहागड येथे आला.अय्याज पाटील याने मयत रामदास गिरी यास फोन करून शहागड येथे बोलून घेतले. त्यानंतर रामदास गिरी यास बळजबरीने पांढ-या रंगाच्या स्कॉर्पिओ ( एमएच १३, एएक्स १३१३) या गाडीमध्ये बसून सोलापूर येथील औंज परिसरात नेले. तिथे रामदास गिरी यांना जबर मारहाण केली. त्यानंतर संशयित अय्याज पाटील याने रामदास गिरी यांचा चुलत भाऊ राजेंद्र गिरी यांना फोन केला. तुझा भाऊ रामदास गिरी यांच्या नाकातून रक्त येऊ लागल्याने आम्ही त्यांना सोलापूरच्या शासकीय दवाखान्यात दाखल केले आहे. गिरी यांचे नातेवाईक खासगी वाहनाने सोलापूर येथे पोहोचले.मात्र, उपचारापूर्वीच रामदार गिरी यांचा मृत्यू झाल्याचे डॉक्टर व स्थानिक पोलिसांनी सांगितले. संशयितांनी रामदार गिरी यांना जबर माहराण केल्यामुळे त्यांच्या संपूर्ण अंगार सूज आलेली होती, असे त्यांचा चुलतभाऊ राधाकिसन गिरी यांनी सांगितले. या प्रकरणी राधाकिसन गिरी यांच्या फिर्यादीवरून अय्याज पाटील जफर पाटील व अन्य सहा जणांवर गोंदी पोलीस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. शहागड चौकीचे पोलीस उपनिरीक्षक विकास कोकाटे तपास करत आहेत.
महाकाळ्याच्या मुकादमाचा सोलापुरात खून, ऊसतोड मजूर न पाठविल्यामुळे घडला प्रकार
By ऑनलाइन लोकमत | Published: November 16, 2017 8:55 PM